उन्नाव पिडीतेवर अंत्यसंस्कार; बहिणीला शासकीय नोकरी, घर, शस्त्र परवाना

0

उन्नाव: उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यात बलात्कारानंतर जिवंत जाळलेल्या तरूणीचा अखेर काल मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले. आज रविवार अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत नाही तोपर्यंत पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. मात्र कुटुंबियांची मनधरणीनंतर अखेर कुटुंबीय सहमत झाले आणि पीडितेला दफन करण्यात आले. पीडितेच्या बहिणीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. घर देण्यात येणार असून पिडीतेच्या भावाला शस्त्र परवानाही देण्यात येणार असल्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली आहे.

लखनऊचे आयुक्त मुकेश मेश्राम यांनी पीडितेच्या बहिणीला नोकरी देण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त पंतप्रधान आवास योजनेंतर्गत दोन घरे कुटुंबास देण्यात येणार आहेत. यापूर्वी पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारने २५ लाख रुपयांची भरपाईही दिली होती. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही मेश्राम यांनी यावेळी सांगितले.