नवी दिल्ली: देशभरात गाजलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या तिच्यावर नवी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये उपचार सुरू आहे. प्रकृती ढासळल्याने तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
२८ जुलै रोजी उन्नाव बलात्कारातील पीडितेच्या गाडीला रायबरेलीत ट्रकने धडक दिली होती. या अपघातात पीडित मुलीच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला. तर पीडिती आणि वकिल गंभीर जखमी झाले होते. तिच्यावर लखनऊ येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. याप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर पीडितेला हवाई रुग्णवाहिकेने सोमवारी सायंकाळी पुढील उपचारासाठी लखनऊ येथून नवी दिल्लीतील ‘एम्स’मध्ये हलवण्यात आले. पीडितेला विमानतळावरून रुग्णालयात नेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ग्रीन कॉरिडोर तयार केला होता. त्यामुळे १४ किमी अंतर १८ मिनिटांत पार करण्यात आले. पीडितेचा रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधोपचाराची गरज आहे. मात्र, तिला शक्तीहीन झाल्याने जीवनरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले आहे. सध्या तिची तब्येत चिंताजनक असुन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत, असे एम्सच्या ट्रामा केअर सेंटरचे प्रमुख डॉ. राजेश मल्होत्रा यांनी सांगितले.