पुणे । पुणे शहर आणि परिसरातील कमाल तापमानामध्ये मागील काही दिवसांपासून चढ-उतार सुरूच आहे. 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेले तापमानात सध्या थोडी घट झाली असली, तरी येत्या काही दिवसांत त्यात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कमाल तापमान वाढू लागले
राज्याच्या काही भागामध्ये आठवड्यामध्ये हलक्या पावसाचीही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यातच उष्णतेची लाट कायम असल्याने बहुतांश ठिकाणचा पारा 40 अंशांपर्यंत आहे. पुणे आणि परिसरामध्येही मागील आठवड्यापासून कमाल तापमानाचा पारा 39 ते 40 अंशांच्या आसपास आहे. 1 मे रोजी शहरात कमाल तापमानाचा पारा 40.7 अंश सेल्सिअस नोंदविला गेला होता. यंदाच्या हंगामातील हा उच्चांक ठरला. त्यानंतर गुरुवारी तापमान काहीसे कमी होऊन 38.4 अंशांवर आले. शुक्रवारी त्यात पुन्हा वाढ होऊन 39.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. त्याचप्रमाणे शनिवारी कमाल तापमान 39.6 अंशांवर गेले. रविवारी शहरातील तापमान आणखी वाढल्याने पुणेकर हैराण झाले होते.
पावसाची शक्यता
उत्तर भारत, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणार्या उष्ण वार्यामुळे शहरातील कमाल तापमानात वाढ होत आहे. पुढील काही दिवसांत शहर आणि परिसरातील किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात आकाश अंशत: ढगाळ राहणार आहे. त्याचप्रमाणे हवेच्या दाबातील बदलामुळे पुढील चार ते पाच दिवसांत कोकण, मध्यम महाराष्ट्र, मराठवाडा, मुंबई, ठाणे, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
प्रमुख शहरांमधील कमाल तापमान
मुंबई (कुलाबा) 34.0 सांताक्रूझ 34.1, अलिबाग 36.2, रत्नागिरी 33.0, पणजी (गोवा) 34.5, डहाणू 34.8, पुणे 39.6, अहमदनगर 42.6, जळगाव 43.0, कोल्हापूर 38.6, महाबळेश्वर 34.5, मालेगाव 43.6, नाशिक 38.7, सांगली 39.8, सातारा 40.1, सोलापूर 42.7, उस्मानाबाद 41.5, औरंगाबाद 40.8, परभणी 43.6, नांदेड 42.5, बीड 43.0, अकोला 44.2, अमरावती 42.8, बुलढाणा 41.1, ब्रह्मपुरी 45.0, चंद्रपुर 44.1, गोंदिया 42.8, नागपूर 44.0, वर्धा 44.0, यवतमाळ 44.0 असे नोंदले गेले.