उन्हाची तिव्रता वाढल्याने रसवंतीगृहे गजबजली

0

चिंबळी : उन्हाचा पारा वाढल्याने तहान भागवण्यासाठी आणि थंडावा मिळण्यासाठी रसवंती गृहांकडे नागरिकांची पावले वळत आहेत. तयमुळे रसवंतीगृहे गजबजलेली दिसत आहेत. काही दिवसांपासून पारा 32 ते 37 अंशावर गेल्याने उष्णता खूपच जाणवत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरीक दुपारी बाहेर पडणे देखील टाळत आहेत. बाजार पेठांमध्ये दुपारीही व्यवहार जवळपास ठप्प असल्यासारखी स्थिती असते. शीतपेयांची मागणी वाढली आहे त्यातही उसाच्या रसाला मोठी पसंती मिळत आहे.

आरोग्यासाठी पोषक असल्याने ऊस रसाच्या गाड्या व रसवंती गृह पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चिंबळी परिसरामध्ये सुरू झाली आहेत. उसाच्या रसात आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने नागरिकांचा ओढा उसाच्या थंडगार रसाकडे जास्त दिसून येतो.रसाबरोबर विविध कंपन्यांची शीतपेये, दही, लस्सी, ताक, आईसस्क्रीम यांना देखील मागणी वाढली आहे. ग्राहकांना पिण्याचे पाणी व बसण्यासाठी खुर्च्या या सुविधा देण्यासाठी दुकानदार तत्पर असतात. त्यामुळे ग्राहकांच्या घशाला थंडावा देणार्‍या रसवंती गृहे व शीतपेय दुकानांतील गर्दी वाढत असल्याचे दिसते.

माठाला मागणी वाढली
पिण्याच्या पाण्यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणार्‍या माठालाही मागणी दिसून येते. माठ विक्रेते उन्हाचा चटका सहन करुन माठ विकण्यासाठी फेर फटका मारत आहेत. चष्मे, टोप्या आदी वस्तूंना मागणी वाढली आहे. तसेच वाढत्या उन्हाबरोबर भारनियमन वाढत जाणार असल्याने त्याचा विपरित परिणाम शीतपेय विकणार्‍या व्यावसायिकांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे रसवंती व्यवसाय करणार्‍यांनी डिझेलवर चालणार्‍या पीटर यंत्रावर रसवंतीगृहे चालू ठेवणे पसंत केले आहे.

पिकांनाही मोठा फटका
उन्हाच्या तडाख्याने भाजीपाला पिकाची मर होऊ लागली आहे. विशेषत: मेथी पीक टिकाव धरत नसल्याने आवक घटली आहे. शेतकर्‍यांना मेथी पीक जगवण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे. दिवसभर उन्हाच्या झळा लागत असतात. त्याचा परिणाम नगदी पिकांवर झालेला आहे.