उन्हाच्या तीव्रतेत शहरात हरवला पाणपोईचा आधार!

0

भुसावळ। सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अंगाची लाहीलाही होत आहे. शहरात असलेल्या मुख्य शासकीय कार्यालयामध्ये पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट दिसून येत आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांनाच पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. कार्यालयात कामासाठी येणार्‍या व्यक्तींनाही येथे पाणी मिळत नाही. भुसावळ हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने शासकीय कार्यालयांमध्ये येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे. शहरातील प्रांताधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपालिका यांसह इतर कार्यालयात येथे येणार्‍यांना पिण्याचे पाणीच नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या ठिकाणावरील काही कार्यालयांमध्ये पाण्याची व्यवस्था कुठे करण्यात आली, हेच दिसून येत नाही. त्यामुळे घशाला कोरड पडत आहे.

अधिकारी घेतात विकत पाणी
तहसिल कार्यालयामध्ये शहर पोलीस ठाण्याच्या बाजूने पाणपोई उभारण्यात आलेली होती. मात्र देखभाल, दुरुस्ती अभावी या पाणपोईची दुरवस्था झाल्याने पाणी बंद झाले आहे. त्यामुळे पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने अधिकारी व कर्मचारी बाहेरुन पाण्याचे जार विकत घेऊन आपली तहान भागवित आहेत. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागातून येथे आपली कामे घेऊन येणार्‍या लाभार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची कुठेच व्यवस्था नसल्याने त्यांना बाहेर जावून पाणी प्यावे लागत आहे.

नागरिकांना होणारा त्रास दूर करावा
तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन शासकीय कार्यालयामध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी होत आहे. शासकीय कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाण असलेल्या बसस्थानकावरही दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये- जा करीत असतात.

दातृत्वाचा झरा आटला
बसस्थानकाबाहेर नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र येथे पाणपोईजवळ सहसा दारुड्यांचाच वावर असून पिण्याच्या पाण्याचा वापर दारुसाठी करीत असतात. तसेच दारु पिल्यानंतर रिकाम्या बाटल्या या कुंडातच सोडून देतात त्यामुळे प्रवाशी येथील पाणी पिणे टाळतात. मात्र बसस्थानकावर पाण्याची व्यवस्था असूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. शहरात अगोदर उन्हाळा लागताच ठिकठिकाणी प्रमुख चौक व कार्यालयांबाहेर काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक पाणपोईची व्यवस्था केली जात होती. मात्र सध्याची स्थिती लक्षात घेतली तर शहरातील दातृत्वाचा झरा आटला की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे.