आंबेगाव : आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळवाडी, पहाडदरा, शिरदाळे इत्यादी गावांमध्ये शेतकरी पावसावर पिके घेतात. या गावांत मागील अनेक दिवसांपासून पाऊस न पडल्याने पिके जळू लागली आहेत. सध्या या भागातील अनेक शेतकर्यांनी बटाट्याचे पीक घेतले आहे. या पिकासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. मात्र, सध्या बटाटा पीक पाण्याअभावी जळू लागले असल्याने शेतकर्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याने शेतकर्यांना पिकांना पाणी देता येत नाही. पाऊस कमी असल्याने शेतकर्यांची तरकारी पिके आणि गुरांचा चाराही जळू लागला आहे. त्यामुळे गुरांच्या चार्याची समस्या निर्माण होऊ लागली असून गुरांना चारा कोठून उपलब्ध करायचा, हा प्रश्न शेतकर्यांसमोर आहे.