उद्यान परिसराला यात्रेचे स्वरूप
पिंपरी : सध्या शाळेला उन्हाळी सुट्टी असल्याने शहरातील विविध उद्यानांत चिमुकल्यांची गर्दी होत आहे. संध्याकाळी ऊन उतरल्यावर आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर किंवा आपल्या आईबाबांबरोबर लहान मुले बागेत येऊन मनसोक्त खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहेत. शाळेला सुट्टी लागली की बच्चे कंपनीची पावले शहरातील उद्यानाकडे वळू लागतात. सायंकाळी घराबाहेर पडलेले बालगोपाळ रात्री उशिरापर्यंत उद्यानांत रमताना दिसत आहेत. काही जण झोका, घसरगुंडी, सी-सॉ अशा खेळण्यावर खेळताना दिसत आहेत तर काही पळणे, लंगडी, लपाछपीचा आनंद घेत आहेत. उद्यानांतील प्राण्यांच्या प्रतिकृतीसोबत चिमुकल्यांसह पालक सेल्फी घेत आहेत. शनिवार व रविवार पालकांना सुट्टी असलेल्या दिवशी उद्यानांमधील गर्दीत वाढ होत आहे. भेळ, चणे- फुटाणे, पॉपकॉर्न, वडा-पाव अशा खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला जातोय.
चिंचवडमधील जिजाऊ गार्डन, निगडीतील भक्ती-शक्ती, दुर्गा देवी, थेरगाव बोट क्लब, संभाजीनगर बर्ड व्हॅली, वाकडमधील सावित्रीबाई फुले उद्यान आदी उद्याने नागरिकांसाठी आकर्षण ठरली आहेत. सायंकाळी पाच ते आठ यावेळेत उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येते आहे. पाणीपुरी, भेळपुरी, रगडा पॅटीस आइस्क्रिम, ज्यूस, दाबेली, डोसा, चायनीज पदार्थांच्या गाड्या पाहिल्या की मुले त्याच्या भोवती गराडा घालतात. त्यामुळे उद्यान परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. सर्व उद्यानांच्या परिसरात संध्याकाळी सध्या असेच वातावरण दिसत आहे.