उन्हाळ्यातही मोरनदीचा डोह पाण्याने भरलेला

0

यावल। आमदार हरिभाऊ जावळे यांच्या निधीतून 25 लाख रुपये खर्च करून मोर नदीपात्रात पाडळसे गावाजवळ पुनर्भरणाचा प्रयोग राबवला आहे. याठिकाणी मे महिन्यातही 25 फुटांपेक्षा जास्त पाणी साठून असल्याने पशुधनाची चांगलीच सोय झालेली आहे. तसेच कासवा आणि पाडळसा गावाला पाणीपुरवठा करणार्‍या कुपनलिकेची पातळी वाढून पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

आमदार जावळेंनी दिला होता 25 लाखांचा निधी
सातपुड्यातून उगम पावणार्‍या तालुक्यातील कासवे पाडळसाकडून पुढे तापी नदीला भेटणार्‍या मोर नदीपात्रात पाडळसे गावाजवळ पाणी अडवले गेल्यास त्याचा दोन्ही गावांना फायदा होईल, असा प्रस्ताव माजी पंचायत समिती सदस्या प्रज्ञा सपकाळे पाटबंधारे विभातून निवृत झालेले के.डी.कचरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या चारुलता बर्‍हाटे, योगेश चौधरी, भूषण चौधरी, संतोष भोई, पाडळसेचे तत्कालिन सरपंच मीना तायडे, उपसरपंच योगराज बर्‍हाटे आदींनी आमदार हरिभाऊ जावळे यांच्याकडे सादर केला होता. त्यानुसार आमदार जावळेंनी पाहणी करून नदीपात्र खोलीकरण बांधासाठी 25 लाखांचा निधी दिला होता.

कूपनलिकांच्या जलपातळीतही लक्षणीय वाढ
यानुसार झालेल्या कामाचे चांगले फलित मे महिन्यातील प्रचंड तापमानातही डोळ्यांना गारवा देणारे ठरते. पुनर्भरणासाठी नदीपात्रात केलेल्या मोठ्या खड्ड्यात आजही प्रचंड पाणीसाठा दिसतो. नदीपात्राततयार केलेल्या डोहात आजही सुमारे 25 फूट पाणी आहे. या बांधाजवळच कासवा पाडळसे गावाला पाणीपुरवठा करणार्‍या दोन कूपनलिका आहेत. त्यांच्या जलपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.