उन्हाळ्यातील वाळवण बनविण्यासाठी बटाटा तेजीत

0

किरकोळ बाजारात प्रति किलो 25 रुपयांवर

मोशी : उन्हाळ्यात महिला वर्षभरासाठी वाळवणाचे पदार्थ करून ठेवत असतात. उपासासाठी लागणार्‍या पदार्थांमध्ये प्रामुख्याने बटाट्याचा वापर केला जातो. त्यामुळे उन्हाळा आणि वाळवणाचे पदार्थ हे जणू समीकरणच बनले आहे. आता घरोघरी वाळवणाचे पदार्थ बनविण्याची महिलांची लगबग सुरू आहे. तसेच या पदार्थांना कडकडीत ऊन्हात सुकविले जाते. त्यामुळे ते वर्षभर छान टिकतात. ऊन खूप असल्याने हे वातावरण वाळवणासाठी सध्या पोषक वातावरणही आहे. त्यामुळे बहुतांश गृहिणींचा कल बटाट्यापासून उपवासाचे ‘होममेड’ वाळवण बनविण्याकडे आहे. त्यामुळे बटाट्याची मागणी वाढली असून, रविवारी (ता. 8) उपबाजारात आवक वाढून भाव तेजीत होते. क्विंटलला सतराशे ते अठराशे रुपये भाव मिळाला.

बटाट्याची तब्बल 24 टन आवक
किरकोळ बाजारात तो प्रति किलो 25 रुपयांवर होता. गेल्या आठवड्यात हेच भाव 10 ते 12 रुपये किलो होते. मोशी येथील श्री नागेश्‍वर महाराज उपबाजारात रविवारी बटाट्याची तब्बल 24 टन आवक झाली. त्यातील वेफर्ससाठी आवश्यक असलेल्या मोठ्या आकाराच्या बटाट्याला मागणी होती. या बटाट्यापासून वेफर्स, उपवासाच्या चकल्या, कडबोळी, साबुदाणा-बटाटा पापड, वडे, कीस, चिप्स आदी पदार्थ बनविले जातात. येथील गृहिणी मंदाकिनी सूर्यवंशी म्हणाल्या की, घरातील सर्वांचा मनपसंत पदार्थ म्हणजे वेफर्स. तसेच बटाट्यापासून बनविलेले सर्वच पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे ते मी घरीच बनविते. त्यासाठी बाजारातून एकावेळी पाच ते दहा किलो बटाटे खरेदी करते.
तर मोशी उपबाजारातील घाऊक व्यापारी दिनेश आल्हाट म्हणाले की, बटाट्यापासून उन्हाळी पदार्थ बनविण्यास महिलांनी सुरवात केली आहे. त्यामुळे मोठ्या बटाट्याला अधिक मागणी आहे. दररोज सुमारे 200 पोती बटाट्याची घाऊक विक्री होते.