उपक्रमशील रहिवासी सोसायट्यांना सामान्य करात सूट

0

‘आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी’ बक्षीस योजनेची संकल्पना

पिंपरी-चिंचवड : शहर हागणदारी मुक्त करणे, घन कचर्‍याचे योग्यरीत्या व्यवस्थापन करणे, या अभियानांतर्गत औद्योगिकनगरीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंबर कसली आहे. त्यातूनच शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे ’आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी’ बक्षीस योजना राबविण्यात येणार असून विजेत्या सोसायट्यांना सामान्य करात सूट देण्यात येणार आहे.

ऑक्टोबर 2019 पर्यंत अभियान
केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आलेले ’स्वच्छ भारत अभियान’ 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत शहरे हागणदारी मुक्त करणे व घन कचर्‍याचे व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करणे, ही दोन प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत. केंद्र सरकारच्या धर्तीवर 15 मे 2015 पासून राज्यातही ’स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ याची अंमलबजावणी सुरू आहे.

…तर शहर स्वच्छ होणार
महापालिकेतर्फेही शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, सहकारी गृहनिर्माण संस्था, नागरिक यांच्या सहयोगाने हे अभियान राबविले जात आहे. आता या अभियानांतर्गत नागरिकांचा सहभाग वाढवून शहरातील गृहप्रकल्पांमध्ये पर्यावरणपूरक आणि स्वच्छता विषयक स्पर्धा घेण्याचे महापालिकेने ठरविले आहे. त्यामुळे शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक होईल, कचर्‍याची वाहतूक होऊन विल्हेवाट करण्यासाठी महापालिका आणि अन्य शासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होणार आहे.