जेसीबी सोडण्यासाठी स्वीकारली एक लाख 20 हजारांची लाच : चाळीसगावात कारवाई
भुसावळ- वनविभागाच्या हद्दीतील जेसीबी मशीन सोडण्यासाठी एक लाख 10 हजारांची लाच मागणार्या वनरक्षकास जळगाव एसीबीच्या पथकाने शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास चाळीसगाव विभागाच्या वनकार्यालयात रंगेहाथ अटक केली. या कारवाईने वनविभागातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे. प्रकाश विष्णु पाटील (50, रा.प्लॉट नं.470/05, शाहु नगर, भडगाव रोड,चाळीसगाव व मूळ रा.माहेजी, ता.पाचोरा. जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे
चाळीसगावात सापळा रचून अटक
चाळीसगावातील 37 वर्षीय तक्रारदाराचे वनविभागाच्या हद्दीत मुरूम खोदण्याचे काम सुरू होते. संशयीत आरोपी असलेल्या वनरक्षक प्रकाश पाटील यांनी जेसीबी मशीन जप्त करीत ते सोडण्यासाठी एक लाख 60 हजारांची मागणी केली. त्यात तडजोड झाल्यानंतर एक लाख 20 हजार रुपये देण्याचे ठरले तर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. शनिवारी रात्री आरोपीने चाळीसगाव वनविभागाच्या कार्यालयातच लाच घेतल्याने त्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी झाला. रात्री उशिरा चाळीसागव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.