उपखेड परिसरात हाय अलर्ट जारी

0

चाळीसगाव । साकूर (ता.मालेगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाल्यानंतर वरखेडे, उपखेड भागात गुरुवारी 7 रोजी हाय अलर्ट जारी करण्यात आला असुन प्रशासनाने दिवसभर सोशल मीडिया, दंवडी, लाऊड स्पीकर, कॉर्नर सभा घेऊन जनजागृती केली. तसेच 7 बळी घेणारा बिबट्या हा दहशतवादी झाला असून, त्याला आपण दिसताक्षणी ‘शूट‘ करणार आहोत, असा दावा हैदराबाद येथील ‘शार्प शूटर’ नवाब शाफत अली खान यांनी बोलतांना केला आहे . मात्र बिबट्याला पकडण्यासाठी किंवा त्याला ठार करण्यासाठी 3 ठिकाणी मचाण उभारणी करण्यात आली असून परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या मदतीसाठी शार्प शुटर तैनात करण्यात आले आहे.

गावागावात दवंडीद्वारे सूचना
बिबट्या एका हल्ल्यानंतर 7-10 कि.मी.अंतरावर जाऊन दुसरा हल्ला करीत असल्याचे लक्षात आल्याने साकूरपासून किमान 10 कि.मी. अंतरातील शेतशिवारात सांभाळून रहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रांताधिकारी शरद पवार, सहाय्यक वनसंरक्षक आदर्श रेड्डी, तहसीलदार कैलास देवरे, वन परीक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. गावागावात लाऊडस्पीकर लावलेले वाहन फिरवण्यात आले. त्यातून बिबट्याच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवे? याबाबत जनजागृती करण्यात आली आहे तसेच सोशल मीडियावर 10 मिनिटांची क्लिप फिरवण्यात येत असुन जे कुटुंब शेतात राहतात, त्यांची वनविभागाच्या पथकाने भेट घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. साकुर, उपखेड शिवारात दिवसभर बिबट्याचा शोध घेण्यात आला. त्यासाठी उसाच्या शेतांमध्ये शॉर्प शुटरने कसून तपासणी केली. मात्र, बिबट्याचा साधा मागसूसही लागला नाही. दरम्यान, बिबट्याच्या दहशतीमुळे या परिसरातील शेतांमध्ये शेतकरी अथवा मजूर येत नाहीत. त्यामुळे कापूस वेचणी इतर कामे रखडली आहेत.