उपचारास उशीर झाल्याने मविप्रच्या संचालकाच्या मुलाचा मृत्यू

1

शिवाजीनगर पूल तोडल्याने पोहचण्यास उशीर 

अचानक प्रकृती खालावल्याने अत्यवस्थ

जळगाव- शहरातील शिवाजीनगर येथील रहिवासी तथा जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारकाचे विद्यमान संचालक महेश आनंद पाटील यांच्या 14 वर्षीय कपिल महेश पाटील या मुलाचा शुक्रवारी रात्री 10.30 वाजता अचानक प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला आहे. शिवाजीनगर पूल तोडल्याने रुग्णालयात पोहचण्यास उशीर झाल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत कपिलच्या आजोबा गिरीश साळुंखे तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी केला आहे.

शिवाजीनगर येथील पी.टी.साळुंखे चौकात महेश आनंद पाटील हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवणे केले. त्यानंतर त्याला बरे नसल्याने औषधी घेतली. औषधी केल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटायला लागले. महेश पाटील यांच्यासह गिरीश साळुंखे यांनी तत्काळ रुग्णालयात हलविण्यासाठी रिक्षा बोलावली.

वाटेतच कपिलची प्राणज्योत मालवली
दूध फेडरेशन रेल्वेगेटकडून रिक्षातून जात असताना याठिकाणी आधीच वाहतूक ठप्प होती. तेथून निघाल्यावर कपीलला सुरुवातीला नंदीनी आठवले यांच्या रुग्णालयात, त्यानंतर प्लस व अपेक्स रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्टरांनी दाखल करुन उपयोग नसल्याचे सांगितल्यावर महेश पाटील हे कपिलला घेवून थेट घरी आले.

पर्यायी रस्ता असता तर…
शिवाजी पूल तोडल्याने दवाखान्यात पोहचण्यास लांबचे अंतरामुळे उशीर झाला. शिवाजीनगर पूल पाडल्याने पर्यायी रस्ता असता, तर कदाचित वेळेत रुग्णालयात पोहचून कपिलवर उपचार करणे शक्य झाले असते, मात्र उशीर झाल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला, असे कपिलचे आजोबा गिरीश साळुंखे यांनी बोलतांना सांगितले. तर माहिती अधिकार कार्यकर्ते दिपककुमार गुप्ता यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निरागस कपिल बळी गेला असल्याचा आरोप केला आहे.