सर्वसामान्य शेतकर्याची मुलगी झाली उपजिल्हाधिकारी; तालुक्यात सर्वत्र कौतुक
तळेगाव दाभाडे माळवाडीच्या स्वाती दाभाडे हिचे यश
तळेगाव दाभाडे: जिद्द, अविरत कष्टाची तयारी आणि यशाबद्दलचा आत्मविश्वास या त्रिसूत्रीच्या आधारावर मावळातील एका सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील मुलीने उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे यावर्षी ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत स्वाती दाभाडे हिने मुलींच्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तिला 900 पैकी 536 गुण मिळाले असून तिची उपजिल्हाधिकारीपदासाठी निवड झाली आहे. सध्या ती नायब तहसीलदार म्हणून काम पाहत आहे. उपजिल्हाधिकारी पदापर्यंय मजल मारणारी स्वाती दाभाडे ही मावळ तालुक्यातील पहिली मुलगी ठरली आहे. तिच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
असे झाले स्वातीचे शिक्षण
स्वातीचे वडील किसन भगवान दाभाडे व आई लक्ष्मीबाई किसन दाभाडे हे अत्यंत अल्प शिक्षित शेतकरी कुटुंब. बहीण सुजाता मुळीक तिचे शिक्षण बारावी पर्यंत झाले आहे. भाऊ विशाल आय.टी.आय. करून खासगी कंपनीत त्याने नोकरी सुरु केली आहे. प्राथमिक शिक्षण स्वातीने स्वतःच्या गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतले. त्यानंतर तळेगाव येथील रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतन येथे दहावीपर्यंतचे शिक्षण स्वातीने पूर्ण केले. 11-12वी इंद्रायणी महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून पुर्ण झाले. नेहमी प्रमाणे वर्गात प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला. स्वातीने लहान मुलांचे क्लास घेऊन कुटुंबाला हातभार लावला आहे. इतर मैत्रिणी शिक्षण घेऊन पुढे जात असल्याचे पाहून तिला स्वस्थ बसवेना. वडिलांच्या पाठीमागे लागून वाणिज्य शाखेत प्रवेश घेत शिक्षण सुरु केले. वाणिज्य पदवी संपादन केली. वाणिज्य शाखेच्या परीक्षेत स्वाती प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्य प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याने वडिलांच्या मित्रांने तिचे शिक्षण पुढे सुरू ठेवण्यास सांगितले. स्वातीने पूर्वीच्या विविध स्पर्धा परीक्षातही मंत्रालय कक्ष अधिकारी, जीएसटी अधिकारी, उत्पादन शुल्क अधिकारी ते नायब तहसीलदार अशा विविधपदांसाठी यश मिळविले होते.
प्रतिकूल परिस्थितीतही शिकली
मुलीच्या यशाचा आनंद व्यक्त करताना किसन दाभाडे म्हणाले की, स्वातीला लहानपणापासूनच शाळा, अभ्यास, अवांतर वाचन आणि विविध विषयांवर चर्चा करण्याची आवड होती. स्पर्धा परीक्षेसाठी परीक्षा मार्गदर्शन केंद्र व युनिक अकादमीतील शिक्षकांचे तिला मार्गदर्शन लाभले. देहूरोड येथील विनोद साबळे यांनी याकामी तिला सर्व माहिती दिली. तिची आई लक्ष्मी आजही भाजी विक्री करून संसाराचा गाडा चालवते. प्रतिकूल परिस्थितीचा तिने कधी बाऊ केला नाही. स्वाती दाभाडे म्हणाल्या की, राज्यसेवा परीक्षेत उत्तीर्ण होण्याची खात्री होती, पण राज्यात मुलींच्यात पहिले येणे जास्त आनंददायक आहे. आई-वडिलांचे हालाखीतील कष्ट हेच माझ्या जिद्दिची प्रेरणा राहिली आहे. उपजिल्हाधिकारीपदावर काम करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे अधिक व्यापक आणि प्रभावीपणे शासकीय सेवा करता येईल मात्र यापुढे आयएएस, आयपीएस होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मुलींनी कोणत्याही एका क्षेत्रात करिअर करण्याचा ध्यास असल्यास यश नक्कीच पदरी पडते.