उपनगरांमधील गोठ्यांचे स्थलांतर नको

0

पुणे : महापालिका हद्दीत असलेले सर्व गोठे महापालिका प्रशासनाकडून मुंढवा, केशननगर येथे 31 जानेवारी पूर्वी स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी मुख्यसभेने ठरावाद्वारे मान्यता दिलेली आहे. या ठरावातून शहरातील उपनगरांमधील गोठे वगळण्यात यावेत, असा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला आहे. नगरसेवक अमोल बालवडकर, अ‍ॅड. प्रसन्न जगताप, स्थायी समिती सदस्य उमेश गायकवाड आणि संजय घुले यांनी दिला आहे.

महापालिकेने सर्व गोठे स्थलांतरीत करण्यास मान्यता दिलेली असून त्यानुसार, आरोग्य विभागाकडून हे स्थलांतरणाचे काम सुरू आहे. मात्र, शहरात समाविष्ट झालेल्या 23 गावांमध्येही मोठ्या प्रमाणात गोठे आहेत. हा भाग महापालिकेत आला तेव्हा त्या ठिकाणी शेती होत होती. तसेच त्यांच्या सोबत दुग्धव्यावसाय म्हणून गोठे उभारलेले होते. हे नागरिक अजूनही आपली गायी, म्हशी तसेच बैलांची व्यवस्थीत संगोपन करतात. त्यांची दैनंदिन स्वच्छता ठेवली जाते. तसेच ही जनावरे रस्त्यावरही येत नाहीत. तसेच या भागातील नागरिकांची त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केलेल्या ठरावातून या गोठ्यांना वगळण्यात यावे, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. मंगळवारी होणार्‍या समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे.