भुसावळ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी जास्त वाढल्यामुळे पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने गुन्हेगारांवर आळा बसू शकत नाही. त्यामुळे शहराच्या हद्दीत वाढ झाल्यामुळे नागरिकांशीच समन्वय साधून गुन्हेगारीला आळा बसविण्याचा प्रयत्न करु व वाहतुक विभागाची विशेष मोहिम 1 एप्रिलपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे विशेष महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी बोलतांना दिली. ते 19 रोजी पोलिस विभागाच्या वार्षिक तपासणीसाठी जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी येथील पोलिस उपविभागीय कार्यालयात त्यांनी विभागाचा आढावा घेऊन अधिकारी व कर्मचार्यांना सुचना दिल्या यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अप्पर पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील, भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिक्षक निलोत्पल उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकार्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवणार
वार्षिक तपासणी असल्याने विभागातील महत्वाचे गुन्हे व विषयांवर अधिकारी व कर्मचार्यांशी चर्चा करण्यात आली. यात हेड क्वॉर्टर, परेड, दरबार, वेल्फेअरसंबंधी विषयांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात पोलिस कमिश्नर रेंजचा सध्यातरी विचार होणार नाही. जिल्ह्यात पोलिस कर्मचार्यांची संख्या चांगली आहे. विविध नवीन शाखा सुरु करण्यात येत असल्याने शाखांमध्ये कर्मचारी नियुक्त होत असल्याने कर्मचारी संख्या कमी नसून आवश्यक तेवढी आहे. भुसावळ येेथे वैद्यकिय अधिकारी नियुक्तीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांमार्फत जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा करुन प्रश्न सोडविला जाणार असल्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक चौबे यांनी सागितले.