खुर्चीचे दडपण होते मात्र भिती नव्हती
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या उपमहापौर शैलजा मोरे यांना महासभेचे अध्यक्षस्थान भुषविण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. उपमहापौरांनी अंत्यत चांगल्या पद्धतीने सभेचे कामकाज चालविले. त्यातून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. दरम्यान, याबाबत त्म्हणाल्या, खुर्चीचे दडपण होते, मात्र भिती नव्हती. महापालिकेची नोव्हेंबर महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी होती. महापौर नितीन काळजे स्पेन दौर्यावर आहेत. त्यामुळे उपमहापौरांनी सभेचे अध्यक्षस्थान भुषविण्याची संधी मिळाली. महापालिकेत उपमहापौरांना पीठासीन अधिकारीपदी बसण्याची संधी मिळत नाही. पालिकेत भाजपची सत्ता येऊन आठ महिने झाले. या आठ महिन्यात एकदाही उपमहापौरांना सभेचे अध्यक्षस्थान भुषविण्याची संधी मिळाली नव्हती.
पहिल्यांदाच मिळाली संधी
सभेच्या सुरुवातीला विषय दाखल करुन घेतले. नंतर नगरसेवकांना बोलण्याची संधी दिली. दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याची महासभा मंगळवार (दि.28) पर्यंत तहकूब करण्यात आल्याचे, उपहापौर मोरे यांनी जाहीर केले. सभेचे कामकाज चालविताना उपमहापौरांच्या चेहर्यावर कोणत्याही प्रकारचे दडपण, ताणतणाव दिसून आला नाही. मिळालेल्या छोट्या संधीतून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली. उत्तमप्रकारे सभा कामकाज चालविल्याबद्दल नगरसेवक, अधिकार्यांनी त्यांचे कौतुक केले. मोरे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत.
खुर्चीचे दडपण होते मात्र, भिती नव्हती!
दैनिक जनशक्तीशी बोलताना उपमहापौर शैलजा मोरे म्हणाल्या, ’’माझ्या मनात कोणतीही भिती नव्हती. मात्र, खुर्चीचे थोडे दडपण होते. महापौरांच्या ’अॅप्रन’ला विशेष महत्व आहे. पीठासीन अधिका-याच्या खुर्चीवर बसल्यावर जबाबदारी वाढते. मिळालेल्या जबाबदारी मी चांगल्याप्रकारे पार पाडली. याचे मला समाधान आहे. त्याचबरोबर सर्व नगरसेवक, अधिकारी यांनी मला प्रोत्साहन दिले. सभेचे अध्यक्षस्थान भुषविण्याची संधी दिल्याबद्दल मी पक्षाचे आभार मानते. सभेत कोणत्याही नगरसवेकांनी गोंधळ घातला नाही. त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते’’.