उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले : भुसावळातील रेल्वे हद्दीतील विस्थापीत झालेल्यांना घरकुल देणार
भुसावळातील कार्यक्रमात ग्वाही ः पालिका ईमारतीसाठी पाच कोटींच्या निधीची घोषणा
भुसावळ : भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण हटवण्यात आल्यानंतर नागरीकांचे पुर्नवसन करणे गरजेचे असताना त्यांना वार्यावर सोडण्यात आले मात्र विस्थापीतांना त्यांच्या हक्काचे घरकुल बांधून दिले जाईल, हे निवडणुकीतील आश्वासन नसून अजितदादांनी दिलेला शब्द आहे व दिलेला शब्द खरा करणे हीच माझी ओळख असून त्यासाठी भले मोठी किंमत मोजावी लागली तरी हरकत नाही, अशी ग्वाही भुसावळातील राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शुक्रवार, 17 रोजी दुपारी चार वाजता आरपीडी रोडवरील डी.एस.ग्राऊंडवर कार्यकर्ता मेळावा झाला. याप्रसंगी भुसावळातील नगराध्यक्ष रमण भोळे यांच्यासह 21 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवार यांनी पक्षाचा गमचा टाकून त्यांचे प्रसंगी स्वागत केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे एकत्रीत स्वागत करण्यात आले तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे यांचाही वाढदिवसानिमित्त सत्कचार करण्यात आला.
भुसावळातील घरकुलांचा प्रश्न मार्गी लावणार
अजितदादा पवार म्हणाले की, रेल्वेच्या हद्दीत अनेक वर्षांपासून राहणार्या नागरीकांना विकासाच्या नावाखाली जाग सोडण्यास भाग पाडण्यात आले मात्र त्यांचे पुर्नवसन करणे गरजेचे असताना त्यांना वार्यावर सोडण्यात आले. कुठल्याही शहरात विमानतळ, धरणे वा जागा अधिग्रहण करताना अतिक्रमण हटवावे लागते मात्र संबंधितांचे पुर्नवसन देखील करणे गरजेचे आहे. भुसावळातील रेल्वे हद्दीतून विस्थापीत झालेल्या नागरीकांना निश्चित त्यांच्या हक्काचे घरकुल दिले जाईल, पालिकेने त्या संदर्भात सुधारीत प्रस्ताव पाठवावा, मुंबईत त्याबाबत बैठक लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.
तर जिल्ह्यात चित्र वेगळे असते !
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर भाजपात असताना खोटे-नाटे आरोप लावण्यात आले, त्यांच्या चौकशा करण्यात आल्या. वैभवशाली महाराष्ट्रात यापूर्वी असे कधीही घडले नाही. राज्य सुसंस्कृत कसे असावे? हा विचार स्व.यशवंतराव चव्हाण यांनी रूजवला होता. तेव्हापासून आतापर्यंत विरोधकांना त्रास दिला जात नव्हता मात्र आता परीस्थिती वेगळी आहे. माजी मंत्री खडसे आमच्या शब्दाला मान देवून राष्ट्रवादीत आल्याने आता पक्षाची जिल्ह्यात मोठी ताकद वाढली आहे. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार होते मात्र मागील वेळी एकच आमदार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी बॅक फुटवर गेली. विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाथाभाऊ पक्षात आले असते तर चित्र कदाचित वेगळे असते! असेही ते म्हणाले. पक्षात आता जुना व नवा वाद होता कामा नये, एकसंघ होवून सर्वांनी काम करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. नवीन लोकांना संधी देण्याचा पक्षात निश्चित प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
नियमित कर्ज भरणार्या शेतकर्यांना अनुदान
उपमुख्यमंत्री म्हणाले की, जे शेतकरी नियमित कर्ज भरतात त्यांना 50 हजार अनुदान देण्याची तरतूद असून कोरोनामुळे परीस्थिती बिकट झाल्याने आधी आरोग्याच्या प्रश्नाला प्राधान्य देण्यात आले त्यामुळे हा विषय प्रलंबित राहिला मात्र आता परीस्थिती निवळत असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, शिवाय दोन लाखांच्यावर कर्ज माफी योजनेबाबत वरीष्ठांशी चर्चा झाली असून हा तिढा सुटणार असल्याचे ते म्हणाले.
दादा आले की चांगले-चांगले सरळ होतात
माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले की, अजितदादा जिथे जिथे जातात तेथे चांगले-चांगले सरळ होतात. भुसावळ शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर विस्थापीत झालेल्या नागरीकांना घरकुल देणे काळाजी गरज असून भुसावळ पालिकेच्या प्रस्तावीत इमारतीसाठी पाच कोटींचा निधी मिळावा, महाराष्ट्रातील नगराध्यक्षांना स्वाक्षरीचे अधिकार पूर्ववत देण्यात यावेत कारण आता हे अधिकार मुख्याधिकार्यांना असल्याने ते स्वतःच टेंडर भरत असल्याचे ते म्हणाले. भुसावळात मोठे उद्योग आणून बेरोजगाराचा प्रश्न सोडवावा तसेच मसाकावर तीन हजार कामगारांचा उदरनिर्वाह असून हा प्रश्न जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यातून असल्याने तो सोडवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त करीत भुसावळला जिल्ह्याचा दर्जा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
चौधरी म्हणाले ; दोन-चार लोकांची दुखापत वाढली
आगामी काळात नाथाभाऊ व आपण सोबत मिळून काम करणार असल्याचे सुतोवाच भाषणात माजी आमदार चौधरी यांनी केले. विकासासाठी आम्ही एकत्र येणार असून कुणीही जुना-नवा असा वाद करता कामा नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केला. काही दोन-चार लोकांची आमच्या एकत्र आल्याने पोटदुखी वाढली असल्याचा टोलाही त्यांनी हाणला.
नगरपालिका व पं.स.वर राष्ट्रवादीचा झेंडा : खडसे
माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, भाजपात असताना मोठ्या प्रमाणावर पक्ष विस्ताराचे काम केले मात्र मला जो झाला नाही तो पक्ष इतरांना काय होणार? असा सवाल खडसेंनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले की, हा पक्ष प्रवेश सोहळा छोट्या स्वरूपात असून आगामी काळात भव्य स्वरूपाचा सोहळा अजितदादांच्या उपस्थितीत घेण्यात येईल. आता गावा-गावात व तांड्या-तांड्यावर पक्ष पोहोचण्याची जवाबदारी वाढली असून शहरातील साडेसहा हजार रेल्वे विस्थापीतांना घरकुलांची प्रतीक्षा असून हा प्रश्न सुटणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. घरकुलांच्या जागेवर आरक्षण बदलाबाबत मंत्रालयापर्यंत प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याबाबत दखल घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आगामी काळात होणार्या पालिका व जि.प. व पंचायत समिती निवडणुकीत जिद्दीने काम केल्यास राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी प्रसंगी केले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी मंत्री डॉ.सतीश अण्णा पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, माजी खासदार अॅड.वसंतराव मोरे, अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार गुरूमुख जगवाणी, माजी आमदार मनीष जैन, चाळीसगाचे माजी आमदार राजीव देशमुख, पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँक माजी अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे, जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्रभैय्या पाटील, जिल्हा निरीक्षक अविनाश आदिक, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, प्रदेश सरचिटणीस नामदेव चौधरी, एजाज मलिक, जि.प.चे माजी सदस्य संजय गरूड (शेंदुर्णी), भुसावळ नगराध्यक्ष रमण भोळे, सावदा नगराध्यक्ष अनिता येवले, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, अशोक लाडवंजारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन नगरसेवक प्रा.सुनील नेवे यांनी तर आभार माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी मानले.