मुंबई: राज्यात २९ वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी २८ रोजी शपथ घेतली, तसेच ६ मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा पार पडला. विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसचे नाना पटोले यांना जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी कोणाची निवड होणार हा निर्णय अद्याप झाला नाही. अजित पवार, जयंत पाटील यांच्यातील उपमुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच आहे. शरद पवारच याबाबतीत अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीकडून कोणत्याही नावाचा निर्णय घेण्यात आला नाही, कदाचित हिवाळी अधिवेशनानंतर या नावावर चर्चा होईल. त्यामुळे उपमुख्यमंत्रिपदासाठी २२ डिसेंबरपर्यत वाट पाहावी लागणार असल्याचं कळतंय. अजित पवार हे राष्ट्रवादीचे गटनेते असताना त्यांच्या नावाची चर्चा उपमुख्यमंत्रिपदासाठी होती. मात्र भाजपाशी हातमिळविणी केल्यानंतर अजित पवारांबद्दल काही नेत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतंय. त्यामुळेच अजित पवारांबद्दल ठोस निर्णय घ्यायचा अधिकार शरद पवारांना आहे.
उपमुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार समर्थकांनी आग्रही मागणी केली आहे. मात्र अजितदादांचे बंड पाहता राष्ट्रवादीकडून यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळकाढूपणा करण्यात येत आहे. आज होणाऱ्या बहुमतासाठी राष्ट्रवादि पक्षाकडून आपल्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे. कामकाजात सहभाग घेऊन मतदान प्रक्रियेत पक्षाचा निर्णय पाळावा असा आदेश पक्षाकडून आमदारांना देण्यात आले आहेत.