उपम्यातून विदेशी चलनाची तस्करी

0

पुणे : पुणे विमानतळावरून निशांत वाय. आणि एच. रंग्लानी अशा दोन संशयित तस्कारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एक महिला आहे. त्यांच्याकडे असलेल्या बॅगांमध्ये मोठ्याप्रमाणात परदेशी चलन सापडले आहे. दोघेही दुबईकडे उपमा हा पदार्थ घेऊन निघाले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या परकीय चलनाची किंमत भारतीय रुपयांमध्ये 1.29 कोटी रुपये इतकी आहे. सीमाशुल्क विभागाने ही कारवाई केली.

उपम्याच्या पिशवीत लपवले चलन
निशांत वाय. नावाचा प्रवाशा इमिग्रेशन अधिकार्‍याला संशयास्पद वाटला. या अधिकार्‍याने सीमाशुल्क विभागाला तशी सूचना दिली. या व्यक्तीने दुबईला जाणार्‍या विमानाचे बुकिंग केले होते. सीमाशुल्कच्या अधिकार्‍यांनी या व्यक्तीच्या बॅगा तपासल्या असता, बॅगांमध्ये नाश्त्यासाठीचा उपमा हा पदार्थ मोठ्या प्रमाणात होता. परंतु, बॅगचे वजन जास्त वाटल्याने तपासणी केली असता एका काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत 86 हजार 600 अमेरिकन डॉलर तर 15 हजार युरो आढळून आले.

महिला प्रवाशाकडेही तेवढेच चलन
यानंतर त्याच विमानातून दुबईकडे निघालेल्या एच. रंग्लानी या संशयीत महिला प्रवाशाची तपासणी केली असता तिच्या एका बॅगेतही उपमा आढळून आला.तिच्याकडील बॅगाही व्यवस्थित तपासल्यानंतर त्यात 86 हजार 200 अमेरिकन डॉलर तर 15 हजार युरो आढळून आले. या दोन्ही प्रकरणातील रक्कम ही भारतीय रुपयांत 1.29 कोटी रुपये इतकी असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. याप्रकरणी दोन्ही प्रवाशांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? याचा तपास सीमाशुल्क विभागाचे अधिकारी करीत आहेत.