आजपर्यंत भारताच्या उपराष्ट्रपतीपदावर ज्या अकरा व्यक्ती विराजमान झाल्या होत्या त्यांमध्ये फक्त आणि फक्त चारच व्यक्ती अशा होत्या, ज्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा हाती घेऊन कार्य केलेले नव्हते! पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन् हे थोर तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ होते. दुसरे उदाहरण, गोपाल स्वरूप पाठक यांचे, जे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती, म्हैसूर विद्यापीठाचे उपकुलगुरू आणि राज्यसभेचे माजी सदस्य होते. तिसरे उदाहरण, महंमद हिदायतुल्ला यांचे, जे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती होते आणि चौथे म्हणाल तर विद्यमान उपराष्ट्रपती महंमद हमीद अन्सारी यांचे जे इंडियन फॉरीन सर्व्हिसची परीक्षा उत्तीर्ण होऊन, अफगाणिस्तान, इराण, सौदी अरेबिया, युनायटेड अरब अमिरात या देशात भारताचे राजदूत होते, ऑस्ट्रेलियात उच्चायुक्त होते आणि अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे उपकुलगुरू होते! डॉ. राधाकृष्णन् आणि हमीद अन्सारी हे दोन वेळा उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले होते. आज याच पदासाठी गोपालकृष्ण गांधी हे एक असे उमेदवार निवडणुकीस सामोरे जात आहेत, जे आजवर कोणत्याही पक्षाच्या राजकारणात सक्रिय नव्हते.
महात्मा गांधी हे त्यांच्या वडिलांचे वडील म्हणून जसे त्यांचे ‘आजोबा’ होते तसेच स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी हे त्यांच्या आईचे वडील या नात्याने त्यांचे ‘आजोबा’ होते! महात्मा गांधी यांचे चौथे पुत्र, देवदास यांनी राजगोपालाचारी यांच्या ‘लक्ष्मी’ नावाच्या कन्येशी प्रेमविवाह केला होता. या दाम्पत्याला चार अपत्ये झाली. त्यांपैकी राजमोहन गांधी हे सर्वात मोठे आणि त्यांच्या पाठोपाठचे, गोपालकृष्ण गांधी, ज्यांचा जन्म 22 एप्रिल 1946 रोजी दक्षिण आफ्रिकेत झालेला आहे. गोपालकृष्ण गांधी यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात ‘एम.ए.’ केल्यानंतर ते 1968 साली ‘आयएएस’ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांची नियुक्ती तामीळनाडूमध्ये विविध ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तत्सम पदांवर झाली. पुढे त्यांना श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, नॉर्वे, आईसलंड. ब्रिटन अशा देशात राजदूत म्हणून काम करण्याची संधी लाभली. 1987 ते 1992 या काळात ते राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांचे प्रधान सचिव होते. 2004 ते 2009 या काळात ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. भारतीय अनिवासी लेखक विक्रम सेठ यांच्या “Suitable Boy’ या जगभर गाजलेल्या कादंबरीचा त्यांनी ‘कोई अच्छा सा लडका’ या शीर्षकाने उत्तम हिंदीत अनुवाद प्रसिद्ध केला आहे. श्रीलंकेतल्या चहाच्या मळ्यात काम करणार्या तामीळ मजुरांच्या कथा आणि व्यथा त्यांनी रेफ्युजी या स्वरचित इंग्रजी कादंबरीत रंगवल्या आहेत. मोगल साम्राज्याचा रीतसर उत्तराधिकारी असूनही आपला सख्खा धाकटा भाऊ औरंगजेब याच्या कटकारस्थानांमुळे त्या मयूर सिंहासनाला कायमचा मुकलेला दारा शुकोह या शहाजहान-पुत्राची कहाणी, गोपालकृष्ण गांधी यांनी कादंबरी स्वरूपात प्रसिद्ध केली आहे.
2015 साली, लंडनच्या पार्लमेंट चौकात महात्मा गांधी यांचा पुतळा जेव्हा उभारण्यात आला तेव्हा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, अभिनेता अमिताभ बच्चन यांच्याच बरोबरीने गोपालदास गांधी हेदेखील तिथे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाल्यानंतर लगेचच गोपालकृष्ण गांधी यांनी त्यांना लिहिले होते, Imperial and ideological examples appeal to you. So, be Maharana Pratap in your struggle as you conceive it, but be an akbar in your repose. Be a Savarkar in your heart, if you must, but be an – ambedkar in your mind. Be an RSS-trained believer in Hindutva in your DNA, if you need to be, but be the Wazir-e–zam of Hindostan that the 69 percent who did not vote for you, would want you to be! गोपालकृष्ण गांधी यांच्या मते कुणालाही फाशीची शिक्षा देणे हे योग्य नाही. महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांनाही ही अमानवी शिक्षा मान्य नव्हती.
गांधी हत्याप्रकरणी दोषी सिद्ध झालेल्या नथूराम गोडसेला फाशी देऊ नये, अशीच आग्रही भूमिका गांधीजींच्या मुलांनी घेतली होती, असे गोपालकृष्ण गांधी यांनी म्हटले आहे. त्याच विचारांचा वारसा मला मिळालेला असल्यानेच मी 1998 च्या बॉम्बस्फोटात दोषी असलेला याकूब मेमन याची फाशीची शिक्षा रद्द करून ती आजन्म कारावासाची करावी यासाठी प्रयत्न केले होतेे.
– प्रवीण कारखानीस
9860649127