उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी भाजपकडून कोण?

0

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी भाजप आणि मित्र पक्षांकडून रामनाथ कोविंद आणि काँग्रेस व मित्र पक्षांकडून मीरा कुमार यांच्यात लढत होणार हे स्पष्ट होतानाच यात कोविंदच विजयी होण्याचेही स्पष्ट संकेत आहेत. त्यानंतर आता उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार निवडीसाठी भाजपमध्ये जोरदार हालचाली सुरु असून पक्षातीलच ज्येष्ठ नेत्याची यापदी निवड होण्याकडे भाजपचा कल असल्याचे दिसून येते. सध्याचे उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपुष्टात येत आहे.

त्यामुळे या पदासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल व हुकूमदेव नारायण यादव यांची नावे चर्चेत असल्याचे समजते. नायडू हे केंद्रात घरे व शहर-दारिद्य्र उच्चाटन तथा माहिती व दूरसंचार खाते सांभाळत आहेत. 1978 साली ते उदयगिरी येथून आमदार म्हणून निवडून आलेले नायडू 1998 पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. हुकूमदेव नारायण यादव हे सध्या बिहारमधील मधुबनी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत असून 2000 मध्ये ते केंद्रीय मंत्री होते. 1970 पासून राजकारणात ते सक्रिय असून समाजसेवक म्हणुनही परिचित आहेत.