उपराष्ट्रपती यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकांना अटक

0

पुणे : आज पुणे महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन करण्याकरिता आलेल्या उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे स्वागत करण्यासाठी उभे असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना व पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. महापालिकेच्या विस्तारीत इमारतीचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

यांना करण्यात आली अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक असलेल्या प्रकाश कदम, योगेश ससाणे, नंदा लोणकर, रत्नप्रभा जगताप यांच्यासह महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि इतर महिला पदाधिकारी नायडू यांच्या स्वागतासाठी पोलिसांच्या परवानगीने उभे होते. मात्र अचानक पाऊस सुरु झाल्याने त्यांनी जागा बदलली. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना गाडीत भरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनला नेले आणि काही काहीवेळात सोडून दिले. यावेळी पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र आल्याने कारवाई केल्याचे कारण पोलिसांनी दिल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात आले.

विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी याबाबत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही निषेध नोंदवला असून महिला पदाधिकाऱ्यांशी चुकीचे वर्तन केल्याचा अनुभव सांगितला. ही अघोषित आणीबाणी असून स्वागत करण्यामुळे अटक केल्याची पहिली घटना असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे या प्रकाराची आम्ही गंभीर दखल घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.