पुणे – दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या बारामतीमध्ये दाखल झाले. येथील पवार कुटूंबियांच्या विविध संस्था अनेक नेत्यांना भुरळ घालत असतात. तर गेल्या काही दिवसांपासून पवार सातत्याने भाजप आणि मोदींवर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर नायडू बारामती भेटीवर आल्यामुळे या भेटीला वलय प्राप्त झाले आहे.
या संस्थांना भेटी देऊन येथील माहिती जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. बारामतीमधील कृषी विज्ञान केंद्र हे तिथे होणाऱ्या शेती विषयक संशोधन, नवीन तंत्रज्ञान यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे पवारांचे राजकीय विरोधकही पुणे परिसरात आल्यावर आवर्जून या संस्थेला भेट देतात. त्यामुळे २ दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असलेले उपराष्ट्पती व्यंकय्या नायडू यांच्या दौऱ्यात बारामतीचाही समावेश होता. कृषी विज्ञान केंद्रातील संशोधनाची माहिती, नव्याने निर्माण होत असलेल्या इंडो डच भाजीपाला संशोधन केंद्राची माहिती ते घेतील.
नायडू बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान संस्थेची पाहणी करणार आहेत. त्यावेळी ते येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर दुपारी पत्रकारांशी उपराष्ट्रपती संवाद साधणार आहेत. दरम्यान उपराष्ट्रपतींनी गुरुवारी पुण्यात २ कार्यक्रमांना हजेरी लावली, पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उद्घाटन उपराष्ट्रपतीच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहतील, अशी चर्चा होती. मात्र पवार या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.
तसेच महापालिकेत विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनीही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींची ही बारामती भेट होत आहे. विरोधी पक्षात असूनही शरद पवारांची सत्ताधाऱ्यांसोबत असलेली जवळीक नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीला भेट दिली होती, उपराष्ट्रपती असलेल्या व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वीही वेळोवेळी पुण्यात आल्यावर पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. आता उपराष्ट्रपती झाल्यावर ते पवारांच्या बारामतीला आले आहेत.