ठाणे । ठाण्यातील निळकंठ हाईटस्, सोळंकी धाम आणि गावंड बाग या तीन गृहनिर्माण सोसायट्यांच्या बागांमध्ये गेल्या 5 महिन्यात मनमोहक आणि रंगीबेरंगी फुलपाखरांचा अधिवास लक्षणियरित्या वाढला आहे. अर्बन बायो डायव्हर्सिटी कन्झर्व्हेशन ग्रुपने सोसायटी सदस्यांच्या सहाय्याने केलेल्या प्रयोगाचे हे फलित आहे. या तीन सोसायट्यांच्या 2 हेक्टरहून अधिक जागेत वेली फुलझाडांवर सध्या 48 प्रकारची मनमोहक आणि रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत आहेत. सोसायट्यांमधील बागा, आंबा, अशोक, बेल, लिंबू, औदुंबर, कृष्णकमळ, बहवा, पपनस, झेंडू, सदाफुली, पानफुटी, कढीपत्ता अशा अनेक झाडांनी बहरल्या आहेत.
अनेक पक्ष्यांचा वावर वाढला
जूनपूर्वी इथल्या बागांमध्ये फुलपाखरांचा अधिवास नगण्य होता. या अभिनव प्रयोगाला सुरूवात झाली त्यावेळी 7 प्रकारची फुलपाखरे या ठिकाणी आढळली. ऑगस्टमध्ये 25, सप्टेंबरमध्ये 34, ऑक्टोबरमध्ये फुलपाखरांची संख्या 48 वर पोहचली आहे. समीर गुळवणे, विशाल शिंदे, जयेश शेवडे, संदिप रानडे, अर्चना सोनार, प्रशांत आणि अंजली देशपांडे, अर्जित झांस यांच्या अभिनव उपक्रमाने या सोसायट्यांचे रूप बदलले असून चिमण्या, साळुंक्या, पोपट अशा पक्ष्यांचा वावरही वाढला आहे.
माहितीद्वारे जनजागृती
फुलपाखरांना खाण्यासाठी पाने तर मधुरस चाखण्यासाठी फुले मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अर्बन बायो डायव्हर्सिटी कन्झर्वेशन ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी या सोसायटीतील सदस्यांना फुलपाखरांची माहिती देऊन त्यांचा अधिवास वाढवण्यासाठी काय प्रयत्न करावे लागतील, फुलपाखरांना उपयुक्त ठरणारी झाडे कोणती, अंडी घालण्यासाठी उपयोगी झाडे कोणती, कोणत्या झाडांची पाने फुलपाखरं खातात याबद्दल माहिती देऊन जागृती केली.