भुसावळ/नंदुरबार : मान्यताप्राप्त ठेकेदाराचे विविध कामे केल्यानंतरचे प्रलंबित 84 लाखांचे बिल काढण्यासाठी 43 लाख 75 हजारांची लाच मागून त्यातील टोकन म्हणून चार लाखांची लाच स्वीकारताना अक्कलकुवा जिल्हा परीषद बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अभियंता सुनील दिगंबर पिंगळे (48), सहाय्यक अभियंता संजय बाबुराव हिरे (52) व खाजगी पंटर अभिषेक सुभाष शर्मा (32) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने अटक केल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. बुधवार, 23 मार्च रोजी दुपारी एक वाजता नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयासमोरील श्री सॉ मिलजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला.
लाचखोरीचा गाठला कळस
59 वर्षीय तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त व नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. तक्रारदार यांना जिल्हा परीषद अंतर्गत अक्कलकुवा उपविभाग मार्फत भगदरी येथील गुरांच्या दवाखान्याची नवीन ईमारत बांधणे, रस्ता सुधारणा, रस्ता जलनिस्सारणाची कामे व इतर 45 कामांचे कार्यारंभ आदेश मिळाले होते व नमूद सर्व कामे तक्रारदार यांनी पूर्ण केली होती. या कामांबाबत तक्रारदार यांची एकूण आठ कोटी पंचेचाळीस लाख एकोन्नवद हजार रुपयांची अंतिम देयके मान्य करण्यात आली होती व त्यातील सात कोटी एकसष्ट लाख एकोन्नवद हजार रुपये इतकी रक्कम तक्रारदाराला प्राप्त होती मात्र मान्य रकमेपैकी उर्वरीत 84 लाखांची रक्कम अनामत म्हणून राखून ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. ही रक्कम मिळण्यासाठी तक्रारदार यांनी वेळोवेळी जि.प.बांधकाम उपविभाग कार्यालय, अक्कलकुवा येथे उप अभियंता सुनील पिंगळे व सहाय्यक अभियंता एस.बी.हिरे यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संपर्क साधला मात्र आधी अदा केलेल्या देयकांबाबतच्या रकमेच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडून उपअभियंता सुनील पिंगळे यांनी तीस लाख पन्नास हजार रुपये व शाखा अभियंता एस.बी.हिरे यांनी 13 लाख पंचवीस हजार रुपयांची मिळून एकूण 43 लाख 75 हजारांची लाच मागणी केली. लाच न दिल्यास तुमचे उर्वरीत देयके तुम्हाला भेटू देणार नाही, अशी धमकीही दिली.
लाचेपोटी सिक्युरीटी म्हणून धनादेश ठेवले
लाचेची रक्कम मिळण्यासाठी आरोपींनी जळगाव जनता सहकारी बँक, शाखा नंदुरबार या बँकेचे 30 लाख 50 हजार रुपयांचा चेक व 13 लाख 25 हजार रुपयांचा चेक दिनेश यादवराव सोनवणे या आरोपींच्या ओळखीच्या इसमाचे नावाने लाचेपोटी लिहून त्यांच्या ताब्यात ठेवला व रोख रक्कम आणून दिल्यानंतर दोन्ही चेक/धनादेश परत करून देऊ, असे तक्रारदाराला सांगितले.
अखेर सापळा रचून आरोपी जाळ्यात
अधिकारीवर्गाकडून लाचेसाठी वाढलेला दबाव व होणारा छळ पाहता तक्रारदाराने बुधवारी नंदुरबार एसीबीकडे तक्रार करून तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. बुधवारी दुपारी एक वाजता नंदुरबार शहरातील एकलव्य विद्यालयासमोरील श्री सॉ मिलजवळ खाजगी पंटराकडे एक लाख तर उर्वरीत तीन लाख आरोपींनी स्वीकारताच त्यांच्या मुसक्या सापळा रचून असलेल्या एसीबीच्या पथकाने आवळल्या.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नाशिक एसीबीचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या नेतृत्वात निरीक्षक समाधान महादू वाघ, निरीक्षक माधवी एस.वाघ, हवालदार उत्तम महाजन, हवालदार विलास पाटील, हवालदार विजय ठाकरे, नाईक अमोल मराठे, नाईक संदीप नावाडेकर, नाईक देवराम गावीत, महिला नाईक ज्योती पाटील, चालक नाईक जितेंद्र महाले आदींच्या पथकाने यशस्वी केला.