उपसरपंच व ग्रा.पं.सदस्यांच्या धमकीने ग्रामसेवक रजेवर

0

पिंपळनेर। खोटी कागदपत्रे द्यावीत म्हणून येथील उपसरपंच व ग्रा.पं.सदस्य योगेश नेरकर यांनी ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे यांना धमकी दिल्याप्रकरणी अहिरे हे वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे गरजू नागरीकांची कामे खोळंबली असून या संपुर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी पिंपळनेरवासीयांनी केली आहे. घराचे बांधकाम पुर्ण झालेले नसतांना पूर्णत्वाचा दाखला देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे यांच्यावर ग्रा.पं. सदस्य योगेश सोमनाथ नेरकर यांनी धमकी देवून दबाव आणल्याचा उल्लेख रजेच्या अर्जात अहिरे यांनी केला आहे.

झालेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी
पिंपळनेर येथील सरोज बियरबार, देशी दारू दुकाने, वाईन शॉप हे महामार्गावर असल्याने ही दुकाने बंद झाली आहेत. दारू पिणार्‍यांसह दारू विक्रेत्यांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे दुकाने सुरु करण्याच्या नादात साम, दाम, दंड व भेद याचा सर्रास वापर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. चिकसे रस्त्यालगत संजय चौधरी यांचे नविन दुकानाचे बांधकाम सुरु असून हे बांधकाम रहिवास नावाने सुरु आहे. हे काम सध्या अपूर्ण असूनही याकामाच्या पूर्णत्वाचा दाखल्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य योगेश नेरकर यांनी केली. त्यासाठी त्यांनी फोनवरून ग्रामविकास अधिकारी एच.एन.अहिरे यांना तसा दाखला करून द्यावा अशा सूचना दिल्या. प्रत्यक्षात ग्रामविकास अधिकारी हे कामावर जावून आल्यावर हे काम अपूर्ण असून त्या कामाचा पूर्णत्वाचा दाखला कसा मिळणार? तरीही दि.10 ऑगस्ट रोजी झालेल्या मासिक सभेत तसा ठराव करून द्यावा व पूर्णत्वाचा दाखला द्यावा, अशी मागणी अहिरे यांच्याकडे योगेश नेरकर यांनी केली. असा उल्लेख अहिरे यांच्या रजेच्या अर्जात करण्यात आला आहे. त्यामुळे अहिरे हे वैद्यकीय रजेवर गेले असून त्यांच्या पश्‍चात सोनवणे यांच्याकडे कारभार सोपविला आहे. या सर्व प्रकारची चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत पिंपळनेरवासीयांनी व्यक्त केली आहे.