उपसिंचन योजनेचा आराखडा बदला

0

धुळे । पावसाळ्यात तापी नदीला महापूर येतो आणि करोडो लिटर पुराचे पाणी वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी शिंदखेडा तालुक्यातील उपसासिंचन योजनेत साठविले जावे तसेच सद्या असलेला उपसिंचन योजनेचा आराखडा त्यासाठी बदलावा अशी मागणी प्रकाशा-बुराई उपसासिंचन संघर्ष समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दरम्यान याबाबत जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. प्रकाशा-बुराईत उपसिंचन योजनेत त्रुटी असल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला आहे.

याबाबतीत संघर्ष समितीने तत्कालीन पाटबंधारे मंत्री,केंद्रीय कृषि मंत्री आदिंकडे निवेदने देवून पाठपुरावा सुरू असून त्याला अद्याप यश आलेले नाही. शिवाय या प्रकल्पात ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यानांही मोबदला मिळालेला नाही. किंवा प्रकल्पग्रस्त परिवारातील बेरोजगारांना रोजगारही मिळालेला नाही. निधी अभावी हा प्रकल्प अपुर्ण असून तो पुर्णत्वास आल्यास शिंदखेडा तालुक्यातील चित्र पालटणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून न्याय मिळण्यासाठी प्रकाशा-बुराई उपसासिंचन सघंर्ष समितीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यात पंच सदस्य सतिश रामराव पाटील, रामसिंग गिरासे, हिरामण बैसाणे, माजी सरपंच भगवान कोळी,बापू कोळी,वसंत वाघ, कृष्णा पाटील,शांतीलाल गोराणे,भटू सोनवणे आदिंसह प्रकल्प बाधीत शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकर्‍यांना न्याय द्या
शिंदखेडा तालुक्यात दुष्काळ असून हा दुष्काळ हटविण्यासासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त करण्यात आलेली आहे. पावसाळ्यात तापीला महापूर येत असतो मात्र हे पाणी योग्य रित्या साठविले जात नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाशा-बुराई उपसिंचन योजनेत त्रुटी असल्याने या आराखड्यात बदल करा अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळालेला नाही. या प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना मोबदला देवून त्यांच्या मुलांना रोजगार देखील देण्यात आलेला नाही याकडे जिल्हाधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.

दुष्काळ हटविण्यास मिळणार मदत
पावसाळ्यात प्रकाशा बॅरेजमधून वाहून जाणारे पुराचे पाणी शिंदखेडा तालुक्यातील दुष्काळी भागात वापरता यावे म्हणून प्रकाशा-बुराई उपसासिंचन योजना राबविली जात आहे. या योजनेतून शिंदखेडा तालुक्यातील अमरावती मध्यम प्रकल्प आणि वाडी-शेवाडी मध्यम प्रकल्प भरण्याचे नियोजन आहे. कारण पावसाळ्यात पूराचे पाणी वाहून न जाता प्रकल्पात साठवून ठेवल्यास शिंदखेडा तालुक्यातील दुष्काळ हटविणे शक्य आहे. मात्र प्रकाशा-बुराईत उपसासिंचन योजनेत काही त्रुटी असून त्यासाठी योजनेच्या आराखड्यात बदल करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.