उपसूचनांमधून सत्ताधार्‍यांना कमाई करायची आहे

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उपसूचना घेण्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले. विरोधात असताना भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीने उपसूचनांद्वारे पैसे कमविले. भ्रष्टाचार केला, असे आरोप करत होते. मग, आता प्रत्येक विषयाला उपसूचना का घेतल्या जात आहेत, असा सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. तसेच उपसूचनांमधून सत्ताधार्‍यांना कमाई करायची आहे, असा आरोप देखील केला. उपसूचनांविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचा, इशारा विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी दिला.

गुलाब पुष्प उद्यानावरून गोंधळ
नेहरुनगर येथील गुलाब पुष्प उद्यानाजवळील उद्यान विभागाच्या जागेवर संगोपन केंद्र उभारण्याचा विषय होता. त्याविषयाला सत्ताधा-यांनी उपसूचना मांडली. परंतु, ती पूर्ण वाचली नाही. ती उपसूचना पूर्ण वाचण्याची मागणी विरोधकांनी केली. बहल म्हणाले, राष्ट्रवादीने उपसूचनांमधून पैसे कमविल्याचे खोटे-नाटे आरोप भाजपने विरोधात असताना केला. त्याचा डंका पिटला. मग आता प्रत्येक विषयाला उपसचूना का घेतल्या जातात. तसेच उपसूचना पूर्णपणे वाचली जात नाही. उपसूचना संपूर्ण वाचली गेली पाहिजे. उपसूचनेचा हेतू काय, कोणत्या नगरसेवकाच्या प्रभागातील ती उपसूचना आहे. त्याची संबंधित नगरसेवकाला माहिती दिली गेली पाहिजे. बहुमताच्या जोरावार उपसूचना मंजूर करणार आहात. बहुमताच्या जोरावर काय काळा कारभार करायचा आहे तो करा, परंतु बहुमताच्या जोरावर किती गैरकारभार करायचा याचे सत्ताधा-यांनी भान ठेवावे. बहुमताच्या जोरावर सत्ताधारी चुकीचे काम करणार असतील तर त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल.

उपसूचना पूर्ण वाचायला काय अडचण?
मंगला कदम म्हणाल्या, उपसूचना सविस्तर वाचल्या पाहिजेत. कोणत्या-कोणत्या कामासाठी किती निधी दिला जाणार आहे. त्याची नगरसेवकांना माहिती दिली गेली पाहिजे. प्रशासकीय मान्यतेच्या उपसूचना नगरसेवकांना सांगितल्या पाहिजेत. नगरसेवक दत्ता साने म्हणाले, उपसूचना पूर्ण वाचायला काय अडचण आहे. उपसूचना वाचण्यासाठी पाच, दहा मिनिटे किंवा खूपच मोठी उपसूचना असेल तर एक तास लागेल. त्याला काय झाले. एक महिन्यातून त्यासाठी तर महासभा घेतली जाते. आयुक्त उपसूचना घेतात. मंजूर करतात, त्याबाबत त्यांचे अभिनंदन, मात्र विषय समितीत तर विरोधकांचे विषय दाखल देखील करून घेतले जात नाहीत, अशी टिप्पणी शिवसेनेच्या नगरसेविका मीनल यादव यांनी केली.

सत्ताधारी असतानाचा कारभार आठवा
भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे म्हणाल्या की, 25 वर्षांत सभागृहात कधीही उपसूचना पूर्णपणे वाचली नाही. वेगवेगळ्या उपसूचना घेतल्या आहेत. परंतु, जे उपसूचना वाचत नव्हते तेच उपसूचना पूर्ण वाचण्याची मागणी करत आहेत. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.