जकार्ता: सायना नेहवालला आशियाई क्रीडा स्पर्धेत अखेर कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं आहे. ३६ वर्षांनी आशियाई स्पर्धांमध्ये भारताला मिळालेलं हे पहिलं पदक ठरलं आहे. उपांत्य फेरीत चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगने सायनावर २१-१७, २१-१४ अशा दोन सरळ सेट्समध्ये मात केली. यिंगवर मात करुन सायना स्पर्धेची अंतिम फेरी गाठेल अशी अनेक भारतीय क्रीडा रसिकांना आशा होती. मात्र प्रत्यक्ष सामन्यात यिंगने पूर्णपणे आपलं वर्चस्व गाजवलं.
दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सायनाने सामन्यात आपलं आव्हान कायम राखलं होतं. मात्र मध्यांतरानंर यिंगने आपल्या खेळाची गती वाढवत सायनाला बॅकफूटला ढकलण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ एक स्मॅश आणि ड्रॉपचे फटके लगावत यिंगने सायनावर पुन्हा एकदा कुरघोडी केली. अखेर २१-१४ च्या फरकाने दुसरा सेट सहज जिंकत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला.