तेहरान : भारतीय ग्रँडमास्टर डी. हरिकाने जागतिक महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची सुवर्णसंधी गमावली. या सामन्यातील दुसऱ्या डावात हरिकाने जॉर्जियाच्या नाना डाग्निझेकडून पराभव पत्करला. हरिकाने पहिला डाव जिंकल्यामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या दृष्टीने दुसऱ्या डावात किमान बरोबरी साधण्याची आवश्यकता होती. मात्र प्रारंभीपासून तिला दडपण झुगारण्यात अपयश आले.
टॅन झोंगयीकडून धक्कादायक पराभव
आता कमी वेळेचा आणखी एक सामना या दोघांना खेळावा लागणार आहे. चीनच्या नवव्या मानांकित टॅन झोंगयीने काळ्या मोहऱ्यांसह धक्कादायक विजयाची नोंद केली. तिने अव्वल मानांकित जू वेनजूनला नामोहरम केले. या दोघींमधील पहिला डाव हा बरोबरीत सुटला. भारताची ग्रँडमास्टर द्रोणावली हरिकाने महिलांच्या विश्व बुद्धिबळ स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. तिने जॉर्जियाच्या सोपिको गुरमिश्विलीचा टायब्रेकमध्ये 3.5-2.5 अशा गुणांनी पराभव केला होता. या सामन्यात २-२ अशा बरोबरीनंतर झालेल्या दहा मिनिटांच्या दोन डावांपैकी पहिल्याच डावात हरिकाने शानदार कामगिरी केली होती. तिने कल्पक चाली करीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूला आक्रमणाची फारशी संधी दिली नव्हती. मात्र या सामन्यात तिला प्रभाव टिकवता आला नाही.