उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभेचे कामकाज सुरु असतांना शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या दिशेने पाण्याची बाटली फेकून मारली . या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला आहे .
काल उल्हासनगर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काल पाणी समस्येवर विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते . या महासभेत विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी सविस्तरपणे आपली मते मांडली . या नंतर मनपा आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांनी या विषयावर प्रशासनातर्फे माहिती दिली होती . महापौर मीना आयलानी यांनी प्रभारी सचिव व उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी कामकाजातील पुढील विषय घेण्यास सांगितले , लेंगरेकर यांनी पुढील विषयाबाबत निवेदन देण्यास सुरवात केल्यानंतर संतप्त झालेल्या शिवसेना नगरसेवक सुनील सुर्वे यांनी लेंगरेकर यांच्या दिशेने पाण्याची बाटली फेकून मारली . या मुळे महासभेत तणावाचे वातावरण झाले .
कायद्याने वागा संघटनेचे अध्यक्ष राज असरोंडकर यांचे म्हणणे आहे कि १० वर्षे शिवसेना सत्तेत होती व सुनील सुर्वे देखील गेल्या वर्षी स्थायी समिती सभापती होते . स्थायी समिती सभापती हे महत्वाचे पद असून सुर्वे यांना त्यांच्या कार्यकाळात पाणी समस्येवर तोडगा काढण्याची संधी होती . १२० करोड रुपयांची पाणी -पुरवठा योजना ३०० करोड रुपयांपर्यंत गेली तरी अद्याप पाणी समस्या कायम आहे . पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा उडविणाऱ्या कोणार्क कंपनीला लोकप्रतिनिधी जाब विचारात नाहीत व उलट प्रशासनाला धारेवर धरतात . काही राजकीय पक्षांचे राजकारण पाण्यावरच चालले आहे .
भारतीय कामगार -कर्मचारी महासंघाचे उल्हासनगर युनिट अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी या घटनेचा निषेध वक्त केला असून उद्या काळ्या फिती लावून कर्मचारी काम करणार आहेत . सुनील सुर्वे यांच्या विरोधात कारवाई झाली नाही तर महानगरपालिकेचे कामकाज बंद पाडण्यात येईल असा ईशारा देखील साठे यांनी दिला आहे . या संदर्भात उपायुक्त जमीर लेंगरेकर यांना विचारले असता ते म्हणाले कि कालच्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आहे .मी महापौर मीना आयलानी यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सभेचे कामकाज करीत होतो तेव्हा हि घटना घडली . या पुढे अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाही . सभेचे कामकाज करतांना प्रशासन नेहमीच निष्पक्षपातीपणे कामकाज चालावे प्रयत्नशील असते असे असतांना देखील या प्रकारच्या घटना घडतात याचा खेद वाटतो .