पल्लीकेली । भारताविरुद्धच्या मालिकेतील दुसर्या वन-डे क्रिकेट सामन्यात षटकांची गती कमी राखल्याने श्रीलंकेचा कर्णधार उपुल थरंगावर दोन वन-डे सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे पुढील लढतींमध्ये कपुगेदरा हा श्रीलंकेचे नेतृत्व करणार आहे. श्रीलंकेचा डाव संपल्यानंतर पावसाचे आगमन झाले. यामुळे खेळ थांबविण्यात आला. यानंतर भारतासमोर डकवर्थ लुईस नियमानुसार 47 षटकांत 231 धावांचे लक्ष्य देण्यात आले होते.
भारताने विजयी लक्ष्य 44.2 षटकांतच पूर्ण केले. असे असूनही श्रीलंका संघ निर्धारित वेळेपेक्षा तीन षटके मागेच होता. त्यामुळे थरंगावर बंदी घालण्यात आली. थरंगाला दुसर्यांदा अशा बंदीला सामोरे जावे लागले. अँजेलो मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत चॅम्पियन्स ट्रॉफीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध थरंगाकडे संघाची सूत्रे आली होती. त्या वेळीही षटकांची गती कमी राखल्याने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. पहिल्या दोन सामन्यांत कसोटी कर्णधार दिनेश चंडिमलला संघाबाहेर ठेवल्यानंतर प्रशिक्षक निक यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती.
श्रीलंका संघ : कपुगेदरा (कर्णधार), दिनेश चंडिमल, थिरिमने, मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, दनुष्का गुणथिलका, कुशल मेंडिस, चामरा कपुगेदरा, मिलिंदा सिरिवर्दना, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजया, लक्षण संदाकन, परेरा, वानिंदू हसरंगा, मलिंगा, दुष्मंथा चामीरा.
अखेर दोन लढतींनंतर श्रीलंकेने संघात दोन बदल केले. दिनेश चंडिमल आणि लाहिरू थिरिमने यांना संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, पुढील दोन वन-डेंत दिनेश चंडिमलला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार नाही. श्रीलंकेसाठी आणखी एक धक्का म्हणजे सलामीवीर दनुष्का गुणथिलकाला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आहे. त्यामुळे पुढील दोन वन-डे लढतींत तरी तो खेळू शकणार नाही. म्हणूनच कसोटी संघातील थिरिमनेला संधी देण्यात आली आहे. थिरिमने शेवटचा वन-डे सामना जानेवारी 2016मध्ये खेळला आहे. भारताविरुद्धची तिसरी वन-डे लढत 27 ऑगस्टला होणार आहे.