उपोषणकर्ते ठेविदार जिल्हा रूग्णालयात

0

जळगाव : बीएचआर मल्टीस्टेट व इतर पतसंस्थांच्या ठेविंच्या निपटार्‍यासाठी जनसंग्राम संघटनेच्या वतीने सुरु असलेल्या बेमुदत सत्याग्रह आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन,सहकार विभाग व बीएचआर संस्थेच्या अवसायकांनी आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सुद्धा दुर्लक्ष केल्याने ठेवीदारांनी आंदोलनाच्या मंडपात श्रीगणेश कलशाची स्थापना केली.कलशात गणपती पाण्यात टाकुन श्रीगणेशाला ठेवी परत मिळाव्यात यासाठी साकडे घालण्यात आले. तर पाच ठेविदारांची प्रकृती खालावल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आंदोलन सुरूच

एमपीआयडी कायद्याने पोलिसात दाखल गुन्हयातील संशयीत आरोपी असलेल्या बीएचआर संचालकांच्या मालमत्ता विक्रीची अधिसूचना शासनाच्या गृह विभागाने तात्काळ प्रसिद्द करण्याची कारवाई व्हावी व जिल्ह्यातील विविध पतसंस्थांच्या ठेवीदारांना सहा-सहा महिने मुदतीचे चेक देऊन ठेवीचा निपटारा करावा या मागण्यांसाठी जनसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 48 ठेवीदार आमरण उपोषण करीत आहेत.सोबतच बीएचआरसह जिल्ह्यातील विविध पतसंस्थांचे ठेवीदार व त्यांच्या कुटुंबियांसह 1100 ठेवीदार साखळी सत्याग्रह आंदोलनात सहभागी आहेत.सत्याग्रहाचा आज शुक्रवारी,18 रोजी चौथा दिवस होता.ज्येष्ठ ठेवीदार दाम्पत्य बळीराम दयाराम वाघुळदे व पुष्पलता बळीराम वाघुळदे यांच्या हस्ते पूजाविधी करून कलश स्थापना करण्यात आली.आंदोलक ठेवीदारांची माजी शिक्षक आमदार प्रा.दिलीप सोनवणे यांनी भेट घेऊन पाठिंबा दिला.

वयोवृद्ध ठेविदारांची प्रकृती खालावली
उपोषणाच्या चौथ्या दिवशी आज 16 रोजी दुपारी 1 वाजता सिव्हील हॉस्पिटलचे डॉ.सुरज वाणी,डॉ.सचिन जगताप व डॉ.मंजुम बेलदार यांच्या वैद्यकीय चमूने आंदोलन स्थळी सर्व उपोषणकर्त्याची तपासणी केली.सलग चार दिवस थंडीत आमरण उपोषणात असलेले पाच ठेवीदारांची प्रकृती अस्वास्थ्य पाहून त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले.नरहरी अवचित झांबरे (वय-80) फैजपूर,सीताराम वेडू इंगळे (वय-78) फेकरी,कमल एकनाथ पाटील (वय-78) पाडळसा, शोभा रमेश बैतुले (वय-63) भुसावळ,साधना किसन फेंगडे (वय-70) न्हावी या पाच उपोषणकर्त्याचा यात समावेश आहे.