उपोषणाची दखल घेत 152 लाभार्थ्यांना मिळाले रेशनकार्ड

0

भुसावळ। तालुक्यातील कंडारी येथील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना रेशन कार्ड मिळत नसल्यामुळे ते स्वस्त धान्य पुरवठ्यासह शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहत होते. यासंदर्भात उपोषण करण्यात आले असता या उपोषणाची दखल घेत तहसिल प्रशासनाने रेशन कार्ड नोंदणी शिबीर घेतले होते. याअंतर्गत 152 कार्ड मंजूर होऊन तीन टप्प्यात त्याचे वितरण होऊन शुक्रवार 7 रोजी झालेल्या तीसर्‍या टप्प्यात 79 लाभार्थ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात रेशन कार्ड वितरीत करण्यात आले.

आमदार सावकारेंच्या प्रयत्नाने अडचणी दूर
कंडारी गावात हातमजुरी करणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांना रेशन कार्ड मिळत नसल्यामुळे त्यांना शासनाच्या विविध योजनांसह स्वस्त धान्य पुरवठ्यापासून वंचित रहावे लागत होते. यासंदर्भात नागरिकांनी तहसिल प्रशासनाकडे वारंवार अर्ज करुनही दखल न घेतल्यामुळे माजी सरपंच सुर्यभान पाटील व माजी उपसरपंच यशवंत चौधरी यांनी ग्रामपंचायतीत रेशनकार्ड नोंदणी शिबीर घेण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत तहसिलदारांनी नोंदणी करुन घेतली होती. मात्र कार्ड मिळण्यास अडचणी येत असल्यामुळे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नांनी 152 लाभार्थ्यांना रेशन कार्ड मंजूर करण्यात आले. एकूण दोन टप्प्यात कार्डांचे वितरण करण्यात आले असून तीसर्‍या शेवटच्या 79 लाभार्थ्यांना रेशन कार्ड वितरीत करण्यात आले. याप्रसंगी सरपंच योगिता शिंगारे, सदस्य डॉ. सुर्यभान पाटील, पोलीस पाटील रामा तायडे, विनायक वासनिक, गौतम जोहरे, माधुरी पाटील, संदीप शिंगारे, भास्कर सोनवणे, दिलीप मोरे, यशवंत चौधरी, धर्मा पाटील, रुपेश माळी उपस्थित होते.