उभ्या टॅकरला मोटारसायकलची जोरदार धडक; तरुण ठार

0

लोहारा । येथील पाचोरा रोड लगत असलेल्या म्हसास धरणाजवळ अभ्या असलेल्या पाण्याच्या ट्रँकरला म्हसास गावाकडून भरधाव वेगात येणार्‍या एम.80 या गाडीने जबरदस्त धडक दिल्याने गाडी चालक युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना 19 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान घडल्याने लोहारे गावात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या संदर्भात पिंपळगाव हरेश्‍वर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

कुटूंबियांवर शोककळा
म्हसास धरणाजवळ पाचोरा रोडला येथील सुभाष आनंदराव देशमुख यांचे शेत असून या शेताजवळ रस्त्याला लागून सुभाष देशमुख यांचे पाण्याचे ट्रँकर उभे होते. संध्याकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान, म्हसास ता.पाचोरा या गावाकडून लोहारे गावाकडे लोहारा येथील अर्जुन त्र्यंबक राजपूत (वय-45) हा तरुण एम.80 या गाडीवर बसून भरधाव वेगाने येत असतांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रँकरच्या मागील बाजूने जबर धडक दिल्याने गाडी चालक अर्जुनचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत अर्जुन राजपूत यास पत्नी, तीन मुले, सून असा परिवार आहे. अर्जुन हा गेल्या काही वर्षापासून आपल्या कुटुंबियांसोबत सुरत येथे हात मजुरीचा व्यवसाय करीत होता. तो काळच त्याच्या मामे भावाच्या मुलाच्या लग्नासाठी लोहारा येथे आला होता. त्याच्या मृत्यूची घटना गावात कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. सदर घटनेबाबत सुभाष आनंदराव देशमुख रा.लोहारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पिंपळगाव-हरेश्‍वर पोलीस स्टेशनला भाग-5 गु.र.नं. 12/2017 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास ए.पी.आय.संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ.अशोक आहिरे, पो.कॉ.सुनिल शिरसाठ, पो.कॉ.संजय पाटील हे करीत आहे. सदर घटनेचा पंचनामा होवून रात्री प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.