भुसावळ- बंद पडलेला ट्रक रस्त्यावरच बेशिस्तपणे लावल्याने भरधाव दुचाकी त्यावर आदळून झालेल्या अपघातात दीपनगरातील कर्मचारी जागीच ठार झाला. लक्ष्मण प्रसाद शर्मा (32, दीपनगर) असे मयत कर्मचार्याचे नाव आहे. दीपनगर प्रकल्पातील ड्युटी संपल्याने शर्मा हे दुचाकी (एम.एच.05 ए.बी.1602) ने भुसावळकडे येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 46 वरील रेल्वे उड्डाणपुलावर अज्ञात चालकाने ट्रक (एम.पी.09 के.सी.5501) रस्त्याच्या मध्यभागी बेशिस्तपणे उभा ठेवल्याने त्यावर वाहन धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवार, 6 रोजी रात्री 10.30 वाजेपूर्वी हा अपघात झाला. या प्रकरणी दत्तात्रय दिलीप पिंपळे (39, नोकरी, दीपनगर) यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकच्या अज्ञात चालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ट्रक चालकाने बेशिस्तपणे ट्रक रस्त्यात उभा ठेवला शिवाय येणार्या-जाणार्या वाहनधारकाला दिसेल अशा पद्धत्तीने इंडिकेटर वा लाईट सुरू न ठेवल्याने अपघात होवून शर्मा यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलीस निरीक्षक अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन खामगड करीत आहेत.