नागपूर : फॉरेस्ट रेंजमधील उमरेड-पवनी-हांडला अभयारण्यात सोमवारी आणखी एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच परिसरात रविवारी चार्जर नामक वाघाचा मृतदेह आढळून आला होता. सलग दोन वाघांच्या मृत्यूमुळे वन्यजीव प्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार, सोमवारी ३१ डिसेंबरला उमरेड-पवनी-क-हांडला अभयारण्यात सकाळी वन विभागाचे कर्मचारी गस्तीसाठी गेले होते. त्यांना चिचगाव कंपार्टमेंट क्रमांक २२६ मध्ये मादी जातीचा वाघ मृतावस्थेत आढळला. वन्यजीव विभागात टी-४ म्हणून नोंद असलेल्या या वाघिणीला राही नावाने ओळखले जात होते. रविवारी चार्जरचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणापासून काही अंतरावर राही मृतावस्थेत दिसून आली. मृतदेहापासून जवळच एक रानडुक्कर अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळून आले. विशेष म्हणजे राहीचा मृत्यूही रविवारीच झाला असावा असा अंदाज वन्यजीव विभागाने वर्तविला आहे.