जम्मू । दक्षिण काश्मीरमधील शेपीयान गावी क्रुरपणे हत्या करण्यात आलेल्या लेफ्टनंट उमर फैयाज यांच्या मारेकर्यांची ओळख पटली आहे. या मारेकर्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी पूर्ण जिल्ह्यात त्यांची पोस्टर्स लावली आहेत. फैयाज यांना तिघा अतिरेक्यांनी ठार केले असून हे अतिरेकी हिजबुल मुजाहिदीनशी संबंधीत असल्याचे बोलले जाते.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टर्समधील इशफाक अहमद ठोकर आणि गयास ऊल इस्लाम दक्षिण काश्मीरमधील पडरपुरा भागात राहणारे आहेत. तर अब्बास अहमद भट्ट मंत्रीबाग येथील राहणारा आहे. या तिघांना पकडून देणार्यास पोलिसांनी रोख इनाम जाहीर केले आहे. फैयाज यांच्या हत्येच्या कटात हिजबुल मुजाहिदीन आणि लष्कर ए तैयबाच्या 10 अतिरेक्यांचा समावेश असल्याच संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. फैयाज यांच्या मारेकरांचा शोध घेण्यासाठी शोपीयानमध्ये मोठ्या प्रमाणात शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. लवकरच या मारेकरांना जिवंत वा मृत पकडले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. फैयाज यांच्या हत्येबाबत काश्मीरमधीलनागरिकांच्याही संतप्त भावना असून स्थानिक लोक लष्करासोबत आहेत, असे एका अधिकार्याने सांगितले. फैयाज यांच्या अंत्यसंस्कारावेळीही काही जणांनी दगडफेक केली होती.
अब्बास अहमद भट सूत्रधार
दहशतवादी अब्बास अहमद भट हा फैयाज यांच्या हत्येतील मुख्य सूत्रधार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याआधी, एका हत्येच्या प्रकरणात अब्बासला 5 वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाली होती. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जामिनावर सुटून आल्यानंतर तो फरार झाला. महाविद्यालयात प्रथम वर्षाला असताना अब्बासला पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्याचे गाव लेफ्टनंट उमर फयाज यांच्या गावापासून थोड्याच अंतरावर आहे. इतर दोन दहशतवादी हे नुकतेच संघटनेत सामील झालेले आहेत. गेल्या एक दीड वर्षांपासून ते दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहेत, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे.
सुट्ट्यांच्या बाबतीत धोरण
फैयाज यांच्या हौतात्म्यानंतर सेनादलाने सुट्ट्यांच्या संदर्भात असलेली मार्गदशक सूचना कडक केल्या आहेत. काश्मीरमध्ये राहणार्या सर्व अधिकारी आणि जवानांना सुट्टीवर जाण्याच्या आधी स्थानिक सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यास सांगितले आहे. काश्मीरमधील अधिकारी आणि जवानांना सुटीवर पाठवण्याआधी स्थानिक पातळीवर त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना सेनादलाच्या सर्व युनिट्सच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आल्या आहेत.