१७ सप्टेंबरला १९ केंद्रांवर होणार मतदान; ३०० पेक्षा अधिक कर्मचार्यांची नियुक्ती
। जळगाव प्रतिनिधी। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाच्या निवडणूकीसाठी रविवार १७ सप्टेंबर रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील १९ केंद्रावर मतदान होत असून या मतदानासाठी विद्यापीठ प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये विद्यापीठ शिक्षकांमधून अधिसभेवर एक, महाविद्यालयीन शिक्षकांमधून अधिसभेवर दहा, व्यवस्थापन प्रतिनिधींमधून अधिसभेवर चार अशा एकूण १५ अधिसभेच्या जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तर विद्या परिषदेसाठी तीन जागा निवडून दिल्या जाणार आहेत. तसेच अभ्यास मंडळांच्या १० जागांसाठी देखील निवडणूक होत आहे. एकूण ५ हजार ७२९ मतदार या निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
असे आहे नियोजन
अधिसभेच्या निवडणूकीसाठी २ हजार ५६० महाविद्यालयीन शिक्षक, ८६ व्यवस्थापन प्रतिनिधी, ८८ विद्यापीठ शिक्षक यांचा समावेश असून विद्या परिषदेसाठी २ हजार ६४८ व अभ्यास मंडळांसाठी ३४७ मतदार आहेत. १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ ही मतदानाची वेळ राहणार असून जळगाव, धुळे व नंदूरबार या तीन जिल्हयात १९ मतदान केंद्रावर ३३ बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एका बुथवर एक मतदान केंद्राध्यक्षासह ९ कर्मचारी कार्यरत राहतील. एकूण ३०० पेक्षा अधिक कर्मचारी या मतदान कामासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. या निवडणूकीसाठी कर्मचार्यांना १४ सप्टेंबर रोजी विद्यापीठात प्रशिक्षण दिले जाणार आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.
मतदान केंद्रांची नावे पुढील प्रमाणे
मु.जे.महाविद्यालय (५),
पी.ओ.नाहाटा महाविद्यालय भुसावळ (२),
जी.जी.खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर (१),
धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर (१),
व्ही.एस.नाईक महाविद्यालय, रावेर (१),
प्रताप महाविद्यालय अमळनेर (१),
डी.एस.पाटील महाविद्यालय एरंडोल (१),
एम.एम.एस.महाविद्यालय पाचोरा (१),
य.ना.चव्हाण महाविद्यालय चाळीसगाव (१),
झेड.बी.पाटील महाविद्यालय धुळे (३),
सि.गो.पाटील महाविद्यालय साक्री (२),
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनगीर (१),
एस.पी.डी.एम.महाविद्यालय शिरपूर (३),
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिंदखेडा (१),
जी.टी.पी.महाविद्यालर नंदूरबार (२),
सु.हि.नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर (१),
पी.एस.जी.व्ही.पी.चे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शहादा (२),
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळोदा (१)
असे मतदान केंद्र निश्चित करण्यात आले आहेत अशी माहिती प्रभारी कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रा.ए.बी.चौधरी व उपकुलसचिव तथा निवडणूक शाखेचे विभागप्रमुख बी.बी.पाटील यांनी दिली.