जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयातील एम.एस्सी. प्रथम वर्ष या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विविध विषयासाठी केंद्रीय पध्दतीने प्रवेश दिला जाणार असून 10 जून पासून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. एम.एस्सी.पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने होत असते. या वर्षी मात्र विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनेनुसार आणि विद्यार्थी हित लक्षात घेता प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात किंवा महाविद्यालयात न जाता ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याने विद्यार्थ्यांच्या वेळेत बचत होणार आहे.
24 जून पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन भरलेले अर्ज स्वीकृती केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करणे आवश्यक आहे. 27 जून रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर होईल. 29 पर्यंत त्यावर आक्षेप नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर 30 रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर प्रवेशासाठी पहिल्या,दुसर्या व तिसर्या फेरीचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी दाऊदी हुसेन यांच्याशी दूरध्वनी क्रमांक 0257-2258411 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी केले आहे.