जळगाव । महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे कार्य व त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी गाणी प्रवीण ओहोळ व त्यांच्या सहकाज्यांनी अत्यंत नेमक्या शब्दात आणि तितक्याच पहाडी आवाजात सादर करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील श्रोत्यांची मने जिंकली. विद्यापीठातील डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाच्या वतीने महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सत्वानिमित्त आज बुधवार दि. 12 एप्रिल रोजी प्रवीण ओहोळ आणि संजय सुर्यवंशी, शरद भालेराव, अनामिका मेहरा, भालचंद्र सामुद्रे यांनी भीमगीते व महात्मा फुले गौरव गीतांचा कार्यक्रम झाला. विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विभागाचे प्रभारी संचालक डॉ. म.सु. पगारे, प्रा.अनिल डोंगरे, डॉ.अनिल चिकाटे उपस्थित होते.
सहकार्यांच्या गायनाला श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नागसेन ताकसांडे व भालचंद्र सामुद्रे यांनी केले. त्यानंतर जवळपास दोन तास रंगलेल्या प्रवीण ओहोळ व त्यांच्या सहकार्यांच्या गायनाला श्रोत्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. धम्मदीप हा मानवतेचा या वंदन गीताने प्रारंभ केला. उजाड राणी किमया केलीस, दलितांचा राजा भिमराव माझा, सुटा-बुटात शोभून दिसतोय भिमराव माझा, कायदा भिमाचा, धाक वाटायचा ढाण्या वाघाचा, ना भाला ना बर्ची, सुज्ञानाचा निर्भळ झरा, जात नव्हती जाता जाता, ज्योतिबाने शाळा काढली पहिली, भिमराजकी बेटी मौ तो जयभिमवाली या गीताला प्रचंड दाद दिली. धनराज रावईकर, सुरेंद्र वाघ आदिंनी साथसंगत दिली. गुरुवार दि. 13 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील दृकश्राव्य कक्षात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.