जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांनी कुलगुरूपदाचा पदभार घेतल्यानंतरची पहिली व्यवस्थापन परिषदेची बैठक शुक्रवार 16 डिसेंबर रोजी झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत प्रारंभी माजी व्यवस्थापन परिषद सदस्या सुशिलाबेन शहा, विद्यापीठ कर्मचारी श्रीधर पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. परीक्षा नियंत्रक प्रा.डी.एन.गुजराथी यांनी या बैठकीत वाणिज्य विषयाच्या मुल्यांकनासाठी प्राध्यापक कमी संख्येने येत असल्याची माहिती दिली.
विविध विद्याशाखांच्या समन्वयकांची केली नियुक्ती
कुलगुरुंनी याबाबतीत सर्व प्राचार्यांशी संपर्क साधला जावा अशा सूचना दिल्या. विविध विद्याशाखांच्या समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली असल्यामुळे पुढील आठवडघापासून संशोधन मान्यता समितीच्या (आर.आर.सी) सर्व विषयांच्या बैठका सुरू होणार असून संशोधनाचे प्रलंबीत प्रस्ताव मार्गी लागतील असे कुलगुरुंनी यावेळी सांगितले. या बौठकीत 2017-18 पासून पदवी/पदव्युत्तर स्तरावर नैसर्गीक विस्तार करण्यासाठी विद्यापीठाकडे सादर केलेल्या अर्जांची छाननी झाल्यानंतर करण्यात आलेल्या शिफारसींचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. विद्यापीठाच्या संलग्नता विभागाने ऐन दिवाळीच्या काळात वाढीव तुकडघा, नैसर्गीक विस्तार, नवीन विषय यासंदर्भातील कामे मुदतीच्या आत केल्याबद्दल या विभागाचे अभिनंदन व्यवस्थापन परिषदेने केले. सन 2017-18 चा बृहत आराखड्यास सहमती दर्शविण्यात आली. विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी, सुरक्षारक्षक व साफसफाई कर्मचारी यांचा पूर्वी देण्यात आलेल्या ठेक्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या दोन सदस्यीय समितीच्या शिफारसींवर याबौठकीत चर्चा करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
प्रारंभी कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील व बीसीयुडी संचालक प्रा.पी.पी.माहुलीकर यांचे स्वागत व्यवस्थापन परिषदेच्या वतीने कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी केले. या बौठकीत प्रा.पी.पी.माहुलीकर, वित्त व लेखाअधिकारी डॉ.बी.डी.कर्हाड, सहसंचालक डॉ.केशव तुपे, परीक्षा नियंत्रक प्रा.डी.एन.गुजराथी यांनी भाग घेवून चर्चा केली. कुलसचिव प्रा.ए.एम.महाजन यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.