उमवीत अधिसभा निवडणुकी संदर्भात बैठक

0

जळगाव । नवीन विद्यापीठ कायद्यानुसार अधिसभेवर (सिनेट) नोंदणीकृत पदवीधरांसाठी 10 जागांची तरतूद करण्यात आली आहे. या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवार 29 रोजी दुपारी 3.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च 2017 पासून नवीन विद्यापीठ कायदा लागु करण्यात आला आहे. या कायद्यान्वये अकृषी विद्यापीठांसाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 लागू करण्यात आला आहे. या कायद्यान्वये विविध प्राधिकरणांच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. प्राधिकरणाचे सदस्य म्हणून निवडून येण्यासाठीची पात्रता, अटी शर्ती महाराष्ट्र शासनाने राजपत्र असाधारण भाग-4 (ब) 29 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे. तसेच 17 मे रोजी निवडणुकीसंदर्भातील परिनियमही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

याविषयावर चर्चा
बैठकीत पदवीधरांच्या नोंदणीसंदर्भात चर्चा करणे, 2017 चे एकरुप परिनियम क्रमांक मध्ये नमूद केल्याप्रमाणे विहित नमुन्यात फॉर्म भरणे, विहित शुल्क दस्तऐवजांसह फॉर्म जमा करणे, याबाबत चर्चा केली जाणार आहे. तरी या बैठकीसाठी पदवीधरांचे माजी प्रतिनिधी निवडणूक लढवू इच्छिणार्‍या विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी यांनी केले आहे.

21 हजार अर्ज वैध : नोंदणीकृत पदवीधरांच्या अर्ज छाननीत 976 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. तर वैध ठरलेल्या अर्जांची संख्या 21 हजार 435 इतकी आहे. वैध ठरलेले अर्ज नोंदणीकृत पदवीधर मानण्यात येईल. तथापि सदर नोंदणीकृत पदवीधरांना विद्यापीठाच्या नियमानुसार नूतनीकरण करावे लागणार आहे. निवडणुकासंदर्भात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने विद्यापीठाच्या वेबसाईटवर पोर्टल सुरू केले आहे.