जळगाव। राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबिर, स्पर्धा,उपक्रम यामध्ये विभाग आणि राज्य पातळीवर पारितोषिक प्राप्त केलेल्या स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी यांचा कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात रासेयोच्या जिल्हा व विभागीय समन्वयक यांची सहविचार कृती आराखडा बैठक आणि रासेयोच्या प्राविण्यप्राप्त प्रतिनिधींचा गुणगौरव सोहळा शुक्रवारी 11 ऑगस्ट रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात झाला. सकाळी प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी व वित्त व लेखा अधिकारी डॉ.बी.डी.कर्हाड यांच्या उपस्थितीत या सभेचे उद्घाटन झाले.
कायमस्वरुपी ब्लेझरची मागणी
प्रा.सत्यजित साळवे यांनी विद्यार्थ्यांना कायमस्वरुपी ब्लेझर दिले जावे अशी मागणी केली होती त्यास अनुसरुन कुलगुरुंनी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकासासाठी फायदा होत असल्याचे नमूद करत रासेयोच्या विद्यार्थ्यांना काही महत्वाच्या उपक्रमात भाग घेताना विद्यापीठाकडून दिले जाणारे ब्लेझर कायमस्वरुपी दिले जातील. तसेच सत्कार करताना रोख पारितोषिकेही दिले जातील अशी घोषणा कुलगुरुंनी यावेळी केली. यावेळी प्रा.सत्यजित साळवे, डॉ.सचिन नांद्रे, पुजा चावडा यांचा सत्कार करण्यात आला. एस.आर.गोहिल, आर.एन.सावळे यांनी रासेयोच्या हिशेब सादरीकरणाबाबत मार्गदर्शन केले. रासेयोचे प्रभारी संचालक प्रा.एस.टी.इंगळे, डॉ.आर.के.जाधव, डॉ.डी.एस.राणे, डॉ.ए.आर.निकम यावेळी उपस्थित होते.