उमवी परीक्षा पध्दतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था

0

जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत असलेल्या प्रशाळेतील परीक्षा ही अगोदर बहुपर्यायी स्वरुपात होत असे. दरम्यान नविन कुलगुरु निवडीनंतर प्रशाळेतील परीक्षा पध्दत ही दिर्घोत्तरी स्वरुपात करण्यात आली. दिर्घोत्तरी परिक्षेबाबत सर्व प्रशाळांना पत्र पाठवुन सुचना करण्यात आले. मात्र दोन वर्षीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी शेवटचे सत्र असल्याने दिर्घोत्तरी स्वरुपाच्या परीक्षा पध्दतीला विरोध केला. विद्यार्थ्यांनी दिर्घोत्तरी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन देखील कुलगुरुना दिले. परंतु काही दिवसांपूर्वी विद्यापीठ प्रशासनातर्फे दिर्घोत्तरी स्वरुपात करण्यात आलेली परीक्षा पध्दत पुन्हा बहुपर्यायी स्वरुपात करण्यात आली असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत अधिकृत पत्र संबंधीत प्रशाळांना मिळालेले नसल्याने विद्यार्थ्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

परीक्षा लघुत्तरी होणार असल्याची चर्चा
विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयाची परीक्षा दिर्घोत्तरी स्वरुपात होत असते. मात्र विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या प्रशाळांची परीक्षा मात्र बहुपर्यायी स्वरुपात होत होती. बहुपर्यायी परीक्षा पध्दतीमुळे विद्यार्थी कमी अभ्यास करत असल्याने बौध्दीक पातळी खालावत असल्याचे निदर्शनात आल्याने प्रशाळा संचालकांनी दिर्घोत्तरी परीक्षा पध्दतीचा आग्रह धरला. त्यामुळे 2017 वर्षातील दुसर्‍या सत्रातील बहुपर्यायी परीक्षा पध्दत रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. द्वितीय वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याचे हे चौथे सत्र आहे. अनेक विद्यार्थी तृतीय सत्रातील काही विषय नापास झाले असल्याने त्यांना दिर्घोत्तरी स्वरुपाच्या परिक्षेबाबत धडकी भरली आहे.