पोलिस भरतीमधील वैद्यकीय चाचणीतील प्रकार
धार : धार जिल्ह्यामध्ये पोलिस भरतीमध्ये मैदानी चाचणीत निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. यामध्ये आरक्षित वर्गातील उमेदवारांचाही समावेश आहे. या उमेदवारांची स्वतंत्र वर्गवारी करणे सोपे व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने अजब मार्गाचा वापर केला. त्यांच्याकडून चक्क उमेदवारांच्या छातीवर एससी, एसटी असे लिहिण्यात आले. या प्रकारावरून आता रुग्णालय प्रशासनाला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
पुर्वीही असे प्रकार घडले
काही दिवसांपूर्वी आरक्षित वर्गातील महिलांच्या भरती प्रक्रियेत गोंधळ झाल्याने पुरुषांच्या पोलीस भरतीत कडक व्यवस्था ठेवण्यात आली होती. यावेळी सीएमओ डॉ. पनिका यांनी सांगितले की, सध्या जिल्हा रुग्णालयात उमेदवारांची वैद्यकीय चाचणी सुरु असल्याचे मला माहिती नव्हते. मात्र, या चाचणीदरम्यान जर उमेदवारांच्या छातीवर एससी, एसटी असे लिहिण्यात आले असेल तर ही गंभीर बाब आहे. याची चौकशी करण्यात येईल तसेच त्यात दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल. पोलिस अधीक्षक विरेंद्र सिंह म्हणाले, गेल्या वेळी भरतीदरम्यान, चुका झाल्या होत्या. त्यामुळे यंदा रुग्णालय प्रशासनाने असे केले असावे. मात्र, तरीही असे का करण्यात आले याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मध्य प्रदेशात या पुर्वीही असे प्रकार घडले आहेत.