उमेदवारांनी शपथपत्रात चुकीची माहिती सादर केल्यास करणार गुन्हे दाखल

0

नंदुरबार । नामनिर्देशन पत्र सोबतच्या शपथ पत्रांमधील कोणत्याही रकान्यातील माहिती न भरल्यास किंवा रिक्त ठेवल्यास राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो. लागू नसलेल्या अथवा निरंक माहिती असलेल्या रकान्यामध्ये तसे स्पष्ट नमूद करणे आवश्यक असून निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी शपथपत्रात चुकीची माहिती सादर केल्यास चौकशीअंती त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

प्रभागाचा क्रमांक स्पष्ट असावा
नगरपालिकेच्या निवडणुका लढविणार्‍या इच्छूक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण तहसीलदार कार्यालयात आज शुक्रवार 17 नोव्हेंबर रोजी देण्यात आले. त्याप्रसंगी त्याबोलत होत्या. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी इच्छुक उमेदवारांना प्रशिक्षण दिले. याप्रशिक्षणात ज्या प्रभागातून उमेदवाराला निवडणूक लढवायची आहे त्या प्रभागाच्या क्रमांक व जागा क्रमांक स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. निवडणुक लढविणार्‍या इच्छुक उमेदवारांचे नाव अंतिम मतदार यादीत असणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

शौचालय असल्याचे शपथपत्र आवश्यक
नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्याची पावती व हमीपत्र न थकबाकीदार नसल्याचा खुलासा पत्र. अनामत रक्कम पावती, शौचालय असले बाबतचे प्रमाणपत्र, उमेदवार पक्षाच्या असल्यास एबी फॉर्म, निवडणूक खर्चासाठी राष्ट्रीयकृत बँकेत नवीन खाते उघडलेल्या पासबुकची झेरॉक्स प्रत आवश्यक आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, मुख्याधिकारी गणेश गिरी, पोनि.नितीन चव्हाण, पोनि. संदीप रणदिवे व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असे आहेत नियम
उमेदवार व प्रस्तावक यांचे नाव ज्या प्रभागाच्या मतदार यादीमध्ये आहे त्या प्रभागाच्या अनुक्रमांक व मतदार यादीच्या भाग क्रमांक तसेच अनुक्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. पक्षाच्या उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या जोडपत्र 1 व जोडपत्र 2 वर पक्षाचे अध्यक्ष, सचिव अथवा अशी सूचना पाठविण्यास अधिकृत केलेल्या पक्षाच्या अन्य पदाधिकार्‍यांची शाईने बॉल पॉइंट पेनने स्वाक्षरी केलेली असावी. सूचनापत्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे पोहोचविणे आवश्यक आहे.