उमेदवारीवरून होळीच्या पूर्वसंध्येला कार्यकर्त्यांची बोंब

0

जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारीचा संभ्रम कायम

जळगाव – जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार कोण? यावरून चांगलाच शिमगा केला जात आहे. दरम्यान उमेदवार जाहीर होत नसल्याने कार्यकर्तेही वरीष्ठ नेत्यांच्या नावाने बोंब ठोकत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसुन येत आहे.
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यांनतर जिल्ह्यात राजकीय धुळवडीला सुरवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे ए.टी.पाटील आणि रक्षाताई खडसे हे दोघे खासदार म्हणुन विराजमान आहेत. २०१९ च्या निवडणुकीसाठी या दोन्ही खासदारांना पुन्हा संधी दिली जाते का? यावर जिल्ह्यात मोठा खल सुरू आहे.
कार्यकर्त्यांसह विरोधकांचेही भाजपाकडे लक्ष
रावेर लोकसभा मतदारसंघातुन विद्यमान खा. रक्षाताई खडसे यांच्यासह अजय भोळे यांचेही नाव चर्चेत आहे. दरम्यान खा. रक्षाताई खडसे यांची उमेदवारी निश्‍चीत मानली जात असली तरी अद्याप भाजपाच्या पार्लमेंटरी बोर्डाकडुन कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते संभ्रमात सापडले आहेत. घोषणा झाली नसली तरी खा. रक्षाताई खडसे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला असुन निवडणुकीच्यादृष्टीने तयारी पुर्ण केली आहे. मतदारसंघात माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावे आणि बैठका घेतल्या जात आहे. तसेच विरोधक असलेल्या राष्ट्रवादीने हा मतदारसंघ अद्याप त्यांच्याकडेच ठेवला असुन त्यांनी देखिल या मतदारसंघातुन उमेदवारी जाहीर केली नाही. ती दुसरीकडे काँग्रेस रावेरची जागा मिळेल या आशेवर तग धरून आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांना तयारी करण्यास सांगितले असले तरी अद्याप त्यांनीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
जळगाव लोकसभेसाठी उमेदवारीविषयी उत्कंठा
जळगाव लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री गुलाबराव देवकरांना मैदानात उतरविले आहे. तर भाजपाकडुन जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खा. ए.टी.पाटील, आ. स्मिता वाघ, करण पवार, आ. उन्मेष पाटील यांची नावे चर्चेत आहे. देवकरांविरोधात कुणाला उमेदवारी द्यायची यावर भारतीय जनता पार्टीत अंतर्गत कलह सुरू आहे. रोज नविन नाव सुत्रांकडुन समोर येत असल्याने देखिल या मतदारसंघातील कार्यकर्ते संभ्रमात पडले आहे.
सोमवारपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता
भाजपाच्या अधिकृत उमेदवारांची यादी सोमवारपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तोपर्यंत तरी जिल्ह्यात उमेदवारीचा हा शिमगा सुरूच राहणार असल्याचे चित्र आहे.