उमेदवारी नाकारल्याने बंडखोरीचे लागले ग्रहण

0

शहापूर । शहापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षांनी उमेदवारी न दिल्याने बंडखोरीचे ग्रहण पक्षांना डोकेदुखी ठरणार आहे. शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 14 तर पंचायत समितीच्या 28 जागांसाठी बहुतांशी सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार नक्की झाले असले, तरी पक्षाचा एबी फॉर्म व युती किंवा आघाडी अधिकृत जाहीर न झाल्याने सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. त्यातच राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना मुलाखती घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र, तालुक्यातील ज्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस बोलावले नाही किंवा उमेदवारी नाकारल्यास हा आपला अपमान आहे, असे समजून अनेकजण बंडखोरीच्या चर्चा करत आहेत.

अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
किन्हवली परिसरातील कार्यकर्ते संतोष भेरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे त्यांची पत्नी वकील अर्चना संतोष भेरे यांना शिवसेनेने आपल्या पत्नीस उमेदवारी नाकारल्याचा आरोप करून नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत संतोष भेरे यांनी शहापुरात पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज झाल्याने किन्हवली गणात पत्नीचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. मागील पंचायत समिती निवडणुकीत आपण अपक्ष उमेदवारी लढवत आपली ताकद दाखवून दिली होती. याच पार्श्‍वभूमीवर भेरे यांनी आपली पत्नी अर्चना भेरे यांचा किन्हवली गणात अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे घोषित केले आहे.

नाराज उमेदवारांचा फटका
किन्हवली गणात बंडखोरीचे ग्रहण राजकीय पक्षाला डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे नाराज उमेदवारांचा फटका कोणत्या राजकीय पक्षाला बसणार हे 14 डिसेंबरला मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या मुलाखतीस न बोलावणे व उमेदवारी नाकारल्याने त्या त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना नाराज व बंडखोर उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांचा मतांचा फटका राजकीय पक्षांना बसण्याची चर्चा आहे. तालुक्यातील ज्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीस बोलावले नाही किंवा उमेदवारी नाकारल्यास हा आपला अपमान आहे असे समजून अनेकजण बंडखोरीच्या चर्चा आहे.